मुंबईत मुसळधार पावसामुळे खचला 'हा' प्रसिद्ध रस्ता, मलबा हटवण्याचं काम सुरु

पूजा विचारे
Thursday, 6 August 2020

पेडर रोड येथे रस्ता खचल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या रस्त्यावर आलेला मातीचा मलबा हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

मुंबईः मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते तसंच रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यातच पेडर रोड येथे रस्ता खचल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या रस्त्यावर आलेला मातीचा मलबा हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. 

सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावासमुळे पेडर रोड येथे केम्स कॉर्नरजवळ एक भिंत कोसळली. तसंच अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा आणि झाडे दूर करण्यात येत आहेत. वादळी वाऱ्यासह रात्रभर मुंबईला पावसानं झोडपल्यानं अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे तर कुठे झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. 

हेही वाचाः मुंबईत मुसळधार पावसाचा व्यापाऱ्यांनाही फटका, धान्यांचं प्रचंड नुकसान

पेडर रोड हा मुंबईतला प्रसिद्ध रस्ता आहे. झाडं आणि मातीचा ढिगारा रस्त्यावरमध्येच येऊन पडला. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यात मुसळधार पावसामुळे रस्त्याला तडे गेल्याचंही पाहायला मिळालं.  मुंबई महापालिका क्षेत्रात जोरदार वाऱ्यांच्या तडाख्याने १४१ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. ही झाडे महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे तात्काळ हटविण्यात आली आहे.

भायखळा परिसरात वादळी वाऱ्यामुळे मोठं झाड कोलमडून पडलं. चर्नी रोड स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने आगीच्या ज्वाळा पेटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. मरीन ड्राईव्ह परिसरातही सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या परिसरातही अनेक झाडे कोसळली आहेत.

अधिक वाचाः  मुंबईच्या मुसळधार पावसात सुप्रिया सुळेंचं 'FB लाईव्ह' , शरद पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

हवामान खात्याने पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडसह कोकणातील अनेक ठिकाणी पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी एक टीम तैनात असून संपूर्ण राज्यात 15 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

mumbai rains peddar road closed due wall collapsed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai rains peddar road closed due wall collapsed