मुंबईत मुसळधार पावसाचा व्यापाऱ्यांनाही फटका, धान्यांचं प्रचंड नुकसान

पूजा विचारे
Thursday, 6 August 2020

मुसळधार पावसाचं पाणी परळ भागातल्या अनेक दुकानात शिरलं. परळ भागात अनेक दुकानात पाणी शिरल्यामुळे धान्य खराब झालं आहे.

 

मुंबईः मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून मुंबई-ठाणे-नवी मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसााचं थैमान सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधारपाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्या तर अनेक घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलं. या मुसळधार पावसामुळे बरंच नुकसान झालं आहे. परळ भागात अनेक दुकानात पाणी शिरल्यामुळे धान्य खराब झालं आहे. 

परळ भागातल्या अनेक दुकानात मुसळधार पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळे दुकानात असलेलं धान्य खराब झालं. खराब झालेलं धान्य दुकानदारांनी दुकानाबाहेर फेकून दिलं आहे. या भागातल्या अनेक व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. 

झाडे उन्मळून पडली

मुंबई महापालिका क्षेत्रात जोरदार वाऱ्यांच्या तडाख्याने १४१ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. ही झाडे महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे तात्काळ हटविण्यात आली आहे. 

सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावासमुळे पेडर रोड येथे केम्स कॉर्नरजवळ एक भिंत कोसळली असून अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. वृक्ष आणि मातीचा ढिगारा रस्त्यावरमध्येच येऊन पडल्याने या ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याने वाहतूक कोंडी झाली. 

हेही वाचाः  मुंबईच्या मुसळधार पावसात सुप्रिया सुळेंचं 'FB लाईव्ह' , शरद पवारांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

नायर, केईएम, जेजे रुग्णालयातही पावसाचं पाणी

पावसाने जोर धरल्यामुळे नायर, केईएम आणि जेजे रुग्णालयामध्ये बुधवारी पाणी साचले. परळमध्ये काही झाडांची पडझडही झाली. रुग्णालय सखल भागामध्ये असल्यामुळे केईएम रुग्णालयाच्या परिसरामध्येही पाणी साचले. येथे वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल झाले. 

अधिक वाचाः  Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो घरीच थांबा; पुढचे 3 तास महत्त्वाचे, दुसऱ्या दिवशीही पावसाचं धुमशान

आजही मुंबईत मुसळधार पाऊस 

मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने मुंबईकरांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्यात. तसंच दुपारी १.५१ वाजता हाय टाईडची शक्यता असल्याची माहिती मुंबई पालिकेनं दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबईचं जनजीवन ठप्प झालं. जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले आणि घरांमध्ये पाणी शिरले. रेल्वेरुळावर पाणी आल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवाही ठप्प झाली. 

हेही वाचाः  चार महिन्यानंतर सुरु झालेल्या 'मॉल'ला नागरिकांनी कसा दिला प्रतिसाद, जाणून घ्या

आज पहाटेपासूनच मुंबईत कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, सायन, दादर, वांद्रेसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

Mumbai parel water Logging shops flooded grain was damaged


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai parel water Logging shops flooded grain was damaged