Mumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी, पालघरमध्ये NDRFची टीम तैनात

पूजा विचारे
Wednesday, 5 August 2020

आज पहाटेपासून मुंबई-ठाण्यासह उपनगरात पुन्हा रिमझिम पावसानं चांगलाच जोर धरला आहे.

मुंबईः आज पहाटेपासून मुंबई-ठाण्यासह उपनगरात पुन्हा रिमझिम पावसानं चांगलाच जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं जोर धरला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड रत्नागिरीच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 

बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नवी मुंबई परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री पासून रिमझिम पाऊस सुरू होता. पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झालाय.

गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यत अतिवृष्टी, मुंबईत मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर तालुक्यासह डहाणू, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये आज पहाटेपासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणीच्या रहिवासी भागात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पावसाचं रौद्ररुप पाहता एनडीआरएफची एक टीम पालघरला रवाना झाली आहे.

हेही वाचाः  झक्कास! उठा उठा... मुंबईकर, ९ वाजले दुकानं उघडण्याची वेळ झाली

मुसळधार पावसामुळे मीरारोड परिसरात कंबरेएवढं पाणी साचलं आहे. मुंबई-गुजरात महामार्गावर नायगाव येथे मुसळधार पावसानं पाणी साचलं आहे. 

सोमवारी दिवसभर किनारपट्टीवर सर्वच जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली, मात्र रात्री उशिरापासून ते मंगळवारी पहाटेपर्यंत संपूर्ण किनारपट्टीला अनेक ठिकाणी पावसाने झोडपले. काही ठिकाणी अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. दरम्यान मुंबई, ठाणे आणि परिसराला मंगळवारी पावसाने झोडपून काढलं. पावसाचा हा जोर पुढचे दोन दिवस कायम राहणार आहे. येत्या 48  तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. 

अधिक वाचाः कोरोनामुळे भुरटे चोर बेलगाम; कारागृहातून पेरॉलवर बाहेर आलेल्यांचा पुन्हा हौदोस

हवामान विभागाच्या मुंबईतील सांताक्रूझ केंद्रावर मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासातील नोंदीनुसार २६८.६ मिमी, तर कुलाबा केंद्रावर २५२.२ मिमी पाऊस पडला. वरळी आणि मालाड परिसरात ३०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यत सर्वच ठिकाणी ११५ मिमीपेक्षा अधिक म्हणजेच अतिमुसळधार पाऊस सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेपर्यंत झाला.

मंगळवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यत मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली. दिवसभर अनेक ठिकाणी जोरदार वारे होते. मंगळवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंतच्या नोंदीनुसार सांताक्रूझ केंद्रावर २९.३ मिमी, कुलाबा केंद्रावर १० मिमी, ठाणे- २३.६ मिमी अशी पावसाची नोंद झाली. संध्याकाळी उशिरा मीरा-भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला होता.

mumbai rains updates red alert issued ndrf team palghar raigad


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai rains updates red alert issued ndrf team palghar raigad