esakal | रुग्णालयांना तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय

बोलून बातमी शोधा

oxygen vehicles
BMCचा ऑक्सिजनसाठी Emergency बॅकअप प्लान
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: सध्या मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर रूग्णालयात होणार्‍या तीव्र ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या नव्या निर्णयानुसार, यापुढे काही रुग्णालय आणि पालिका वॉर्डजवळ सहा क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (QRV) ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा: चिंता वाढवणारी बातमी: कोरोनामुळे तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण 8 टक्क्यांवर

त्या प्रत्येक वाहनांमध्ये इतर साहित्याव्यतिरिक्त ७ हजार लिटरचे २५ सिलेंडर्स असतील. यासोबतच या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे अधिकारीही उपस्थित असणार आहेत. या सहा वाहने बीएमसीच्या जंम्बो कोविड सेंटर्सजवळही तैनात असतील. त्यात भायखळ्यातील रिचर्डसन आणि क्रुडास, वरळीतील पोद्दार हॉस्पिटल, बांद्रा येथील केबी भाभा हॉस्पिटल, कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटल, कुर्ला आणि भांडूप मधील बीएमसीच्या कार्यालयाजवळ असतील.

मुंबईला दररोज सुमारे २५० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असते, असं अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितलं आहे. पुढे वेलरासू म्हणाले की, हे क्विक रिपॉन्स व्हेईकल बऱ्याचदा लहान वैद्यकीय सुविधांसाठी असतात. रविवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरात १५० टन ऑक्सिजन आणला आहे. त्यामुळे आता मुंबई शहरात जिथे आवश्यक असेल तिथे ऑक्सिजनचं रिफिलिंग सुरु होईल. पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू स्टील प्लांटमधून तसेच जामनगर येथून ऑक्सिजन आणला असल्याचं वेलरासू सांगितलं.

हेही वाचा: अमित शहा यांना कोरोनाचा प्रार्दुभाव दिसत नाही का?- काँग्रेस

दुसरीकडे मुंबई पालिकेनं ऑक्सिजनच्या साठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचाही निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेनं पथके नेमली आहे. नेमलेली पथकं रुग्णालयांना दररोज प्राप्त होणाऱ्या ऑक्सिजनच्या साठ्याची माहिती गूगल ड्राईव्ह मध्ये साठवतील. यामुळे मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये दररोज किती ऑक्सिजन उपलब्ध होतो, यावर देखरेख असेल. तसंच एखाद्या रुग्णालयातील ऑक्सिजन संपत आल्यानंतर त्याचीही माहिती तात्काळ उपलब्ध होईल.