ब्रेनडेड परदेशी महिलेमुळे मुंबईत पाच जणांना मिळाले नवजीवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teresa Fernandez

ब्रेनडेड झालेल्या ६७ वर्षीय स्पॅनिश महिलेने ५ लोकांना अवयवदान करीत त्यांचे प्राण वाचविले आहेत

Mumbai: ब्रेनडेड परदेशी महिलेमुळे मुंबईत पाच जणांना मिळाले नवजीवन

मुंबई : येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये ब्रेनडेड झालेल्या ६७ वर्षीय स्पॅनिश महिलेने ५ लोकांना अवयवदान करीत त्यांचे प्राण वाचविले आहेत. त्यापैकी ४ नागरिक भारतीय असून, १ लेबनीज येथील रहिवासी आहे. स्पॅनिश महिलेच्या कुटुंबीयांनी अवयनदानाची परवानगी दिल्याने ५ जणांना नवजीवन मिळाले.

टेरेसा फर्नांडीज (मूळ रा. स्पॅनिश) या पर्यटनासाठी भारतामध्ये आल्या होत्या. गुरुवारी (ता.५) मुंबई जवळील एलिफन्टा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांसह गेल्या होत्या. लेणी पाहून परत येताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना त्वरित जवळील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रकिया करण्यात आली. फर्नांडीज यांना उच्च रक्तदाब असल्याने शस्त्रकिया करूनही प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे डॉ. आजाद इराणी यांनी सांगितले. दरम्यान, फर्नांडीज यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले.

फर्नांडीज यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या शरिरातील ५ अवयव दान करण्यात आल्याची माहिती डॉ. सुधीर आंबेकर यांनी दिली. चेन्नई येथे उपचार घेत असलेल्या लेबनीज येथील रुग्णाला ह्रदय, तर फुफ्फुस, यकृत आणि दोन मूत्रपिंड स्थानिक रुग्णांना देण्यात आल्याची माहिती मुंबई येथील अवयव आणि पेशी प्रत्यारोपण संस्थेद्वारे देण्यात आली.

टॅग्स :MumbaiTouristLifeorgan