मुंबई-ठाण्याची ओळख असलेला वडापाव "लॉकडाऊन'च? ...घमघमाटासाठी खवय्ये तरसले!

दिपक शेलार
Sunday, 30 August 2020

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने मोठी समस्या उभी ठाकली आहे. चौथ्या टप्प्यातील अनलॉकनंतर काही उद्योग व्यवसाय सुरू झाले; परंतु गोरगरिबांच्या पोटाची भूक शमवणारे खाद्यान्न अशी ओळख असलेल्या "वडापाव'च्या हातगाड्या अद्याप बंदच आहेत. त्यामुळे गोरगरिबांसह खवय्यांना रस्त्यावरील वडापावची प्रतीक्षा आहे.

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने मोठी समस्या उभी ठाकली आहे. चौथ्या टप्प्यातील अनलॉकनंतर काही उद्योग व्यवसाय सुरू झाले; परंतु गोरगरिबांच्या पोटाची भूक शमवणारे खाद्यान्न अशी ओळख असलेल्या "वडापाव'च्या हातगाड्या अद्याप बंदच आहेत. त्यामुळे गोरगरिबांसह खवय्यांना रस्त्यावरील वडापावची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे वडापावची गाडी अनेक महिने बंद असल्याने विक्रेत्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनली आहे. आणखी काही काळ अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात करायचे तरी काय, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. 

ही बातमी वाचली का? आयआयटी पवईत कामादरम्यान मार्बलच्या लाद्या अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू

लॉकडाऊन होऊन आता तब्बल साडेपाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. राज्य सरकार टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबवत असली, तरी हॉटेल व तत्सम दुकानांसह रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अद्याप परवानगी दिलेली नाही. विशेषकरून छोट्या व्यावसायिकांना याची सर्वाधिक झळ बसत आहे. हातावर पोट असणाऱ्या विक्रेत्यांची मोठीच अडचण निर्माण झाली आहे. त्यातला एक घटक असलेल्या हातगाडीवरील वडापाव विक्रीचा व्यवसाय करणाराही लॉकडाऊनमुळे पिचून गेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर हातगाडी लावण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. त्यामुळे रस्त्यावरील वडापाव व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दररोज वडापाव विकून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू होता; मात्र व्यवसाय बंद असल्याने अनेक कुटुंबे हलाखीत जगत आहेत. 

ही बातमी वाचली का? कोरोनाच्या भीतीने वाफ देण्याच्या मशीनला मागणी वाढली; रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा 

नोकरदारांची उपासमार 
नोकरी- व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणारे भूक लागली की, रस्त्यावरील हातगाडीवर वडापाव खातात. अवघ्या 10 ते 12 रुपयांत पोटाला आधार मिळतो; परंतु आता हा आधार हरपला आहे. वडापावविक्रेत्यांवर बंधने आल्याने सर्वसामान्यांचीही उपासमार होत आहे. कोरोनामुळे मुंबई-ठाण्यातील अनेक वडापावविक्रेते बेरोजगार झाले आहेत. मराठी माणसाची ओळख असलेला हा व्यवसाय ठप्प झाल्याने विक्रेते चिंताग्रस्त झाले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात हातगाडीवरचा गरमागरम वडापाव खाण्यासाठी खवय्ये प्रतीक्षेत आहेत. 

ही बातमी वाचली का? भिवंडीत मासेमारी करायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

अनेक वर्षांपासून हातगाडीवर वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. कुटुंबाचा चरितार्थ याच व्यवसायावर चालतो; मात्र लॉकडाऊननंतर वडापावची गाडी लावण्यावर बंदी आली. त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकणे अवघड झाले आहे. सरकारने काही नियमावली बनवून चालना दिल्यास वडापाव विक्रेत्यांना दिलासा मिळेल. 
- संतोष बोडके, वडापाव विक्रेता, ठाणे 

----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai-Thane identity Vadapav "Lockdown"? Vendors are in dire straits, Employees waiting for food