भटके दहशतवादी

नेत्वा धुरी
रविवार, 16 डिसेंबर 2018

शेतशिवाराची राखण करण्यासाठी गावखेड्यांत कुत्रे पाळले जातात. अनेक घरांत गावठी कुत्री असतात. घरात किंवा शेतात नासधूस करण्याच्या इराद्याने कुणी येऊ नयेत म्हणून ती पहारा ठेवून असतात. या कुत्र्यांची संख्या वाढत जाते, तेव्हा असंख्य कुत्री मोकाट सुटतात. ती भटकत राहतात. त्यातली काही गावाच्या वेशीवर राहून गावाची रखवालदारी करतात. उष्टेपाष्टे खाऊन जगतात. शहरांतही अशा भटक्‍या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे आणि ते माणसांना चावत असल्याने त्यांची दहशत वाढली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांतील ‘भटक्‍या दहशतवाद्यां’वर हा दृष्टिक्षेप..!

भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात सांगलीतील पाच वर्षांच्या मुलाने जीव गमावल्यानंतर कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याविरोधात प्रतिबंधात्मक उपाय तातडीने योजले जावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कुत्र्यांचे हल्ले रोखायचे असतील, तर बचावात्मक उपाय काय असावेत, सांगताहेत परळच्या बैलघोडा रुग्णालयाचे सचिव आणि ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. जे. सी. खन्ना.

कुत्र्यांचे हल्ले वाढण्यामागे नेमके कारण काय असावे?
मानव आणि श्‍वान संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. यामागे कुत्र्यांना सांभाळण्याचे बिघडते नियोजन मुळात कारणीभूत आहे. कुत्र्यांची संख्या, लसीकरण आदी सर्वच घटक यात येतात. यातील एकही घटक चुकला, की मानव आणि श्‍वान संघर्षाला सुरुवात होते.

कुत्र्यांचे हल्ले कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाची भूमिका काय आहे?
पालिकेच्या आरोग्य खात्याने पाळीव प्राण्यांच्या लोकसंख्येवर बंदी आणायला नसबंदीचा कार्यक्रम आखला आहे, परंतु नसबंदीला प्राणीप्रेमींकडून नाहक विरोध होतो. बेसुमार संख्यावाढ झाली, की अडचणींचा डोंगरच उभा राहतो. मग तो माणूस असो वा जनावर. एका नोंदीनुसार भारतात २५ लाख भटके कुत्रे आहेत. ३६ माणसांमागे एक कुत्रा असे गुणोत्तर आपल्या देशात सद्यस्थितीला आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला निश्‍चितच मर्यादा असावी.

वाढत्या हल्ल्याला माणूस कारणीभूत आहे की कुत्रा?
निश्‍चितच माणूस. आपल्याकडे सर्रास कुत्र्यांना खेळण्याप्रमाणे वागवले जाते. कुत्रा मनोरंजनाचे साधन नाही. भटक्‍या कुत्र्यांना दगडाने मारले जाते. सोसायटीतील कुत्र्यांना काठीने बदडले जाते, घरातील कुत्र्यांनाही चांगली वागणूक दिली जात नाही. कुत्र्यांच्या मनात या गोष्टींची नोंद असते. कधी तरी भडका उडाल्यानंतर कुत्रे संबंधितांवर हल्ला करतात. कुत्र्यांची योग्य निगा राखण्याची जबाबदारी पेलता येत असेल तरच कुत्रे पाळा. कुत्र्यांना भुकेले ठेवून, त्यांचे लसीकरण टाळून कुत्र्यांचे हल्ले वाढण्याची शक्‍यता जास्त असते.

कुत्र्यांचे हल्ले रोखण्यासाठी काय उपाय करावेत?
मुळात पालिकेने नसबंदीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवणे आवश्‍यक आहे. कुत्रा पाळण्याचा परवानाही सक्तीने राबवायला हवा.
पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करावे. लोकांसाठी जनजागृतीचे कार्यक्रम आखावेत. रेबीज या आजाराला अद्यापही अपेक्षित महत्त्व आलेले नाही. यासाठीदेखील प्रयत्न होणे जरुरीचे आहे.

काय करू नये?
कुत्र्यांची छळवणूक थांबा; अन्यथा कुत्रे लचका तोडल्याशिवाय राहणार नाहीत.

कोट्यवधींचा फक्त चुराडाच!
१० कोटी रु.- १९९८ पासून आजपर्यंत निर्बीजीकरणावर झालेला खर्च
२ लाख ८०८६९ - १९९८ पासून निर्बीजीकरण झालेली श्‍वानांची संख्या 
१ लाख २३७९ - भटक्‍या कुत्र्यांची आजची संख्या 

खर्चही वाढता...
५ ऑक्‍टोबर १९९८ ते ३१ मार्च २०११ पर्यंत दोन लाख ३० हजार ४३४ श्‍वानांचे निर्बीजीकरण. खर्च सहा कोटी ४६ लाख ७४ हजार.
१ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१३ पर्यंत २४ हजार ८५६ निर्बीजकरण. खर्च एक कोटी ४३ लाख ९२ हजार.
१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत २५ हजार ५७९ निर्बीजीकरण. खर्च दोन कोटी १० लाख ३९ हजार.
१९९८ पासून २०१७ पर्यंत दोन लाख ८० हजार ८६९ श्‍वानांचे निर्बीजीकरण. खर्च १० कोटी एक लाख पाच हजार ८५७ रुपये.

**********************************************

नसबंदीनतंरही कुत्र्यांची संख्या वाढतेच आहे... 
(राजेश मोरे)

ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी किमान पाच हजार भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी केली जात असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नव्हे, तर पुढील वर्षी शहरातील सर्व कुत्र्यांच्या नसबंदीचे लक्ष्य पूर्ण होईल अशी माहिती दिली जात आहे, पण त्याच वेळी आजच्या घडीला शहरात भटके कुत्रे नक्की किती आहेत, याची माहिती मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच १४ वर्षे नसबंदीची प्रक्रिया राबवूनही कुत्र्यांची संख्या वाढता वाढता वाढतेच आहे.

ठाणे महापालिकेतील भटक्‍या कुत्र्यांवरील नियंत्रण योग्य असल्याचा दावा केला जात आहे. शहरात कुत्र्यांची संख्या मर्यादित असून मुंब्रा, कळवा, घोडबंदर परिसरात मात्र भटक्‍या कुत्र्यांची संख्या जास्त असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे, पण मुख्य शहरात रात्री १० नंतर कोणत्याही नाक्‍यावरून प्रवास केल्यास प्रत्येक नाक्‍यावर कुत्र्यांच्या झुंडी पाहावयास मिळतात. आजच्या घडीला शहरात दरवर्षी भटके कुत्रे संबंधित आजाराचे सुमारे आठ हजार रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेतात, पण त्यापैकी थेट चावा घेतलेले रुग्ण एक हजार असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे. इतर रुग्ण हे कुत्र्याचे नख लागले, लाळ जखमेच्या बाजूला लागली आदी कारणांमुळे उपचार घेतात. मुंब्रा येथे एका १० वर्षीय मुलाच्या चेहऱ्याचे लचके भटक्‍या कुत्र्यांनी तोडल्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. त्यानंतर अशी घटना घडली नसली तरी ठाण्यात भटक्‍या कुत्र्यांची दहशत कायम आहे.

उल्हासनगरमध्ये भटक्‍या कुत्र्यांच्या चाव्यामुळे एकाच वेळी सात मुले जखमी झाल्याच्या घटनेनंतर भटक्‍या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला. ठाण्यात अनेक वेळा कुत्र्याने चावा घेतल्यास ते खासगी रुग्णालयात उपचार घेतात. त्यामुळे त्याची नोंद महापालिकेकडे होत नाही. केवळ महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची नोंद केली जाते. त्यामुळे महापालिकेच्या नोंदीनुसार दिवसाला केवळ पाच जणांना कुत्रा चावण्याच्या घटना घडतात. हा आकडा दिवसाला तब्बल ६० असल्याचा दावा दक्ष नागरिक सत्यजित शहा यांनी केला आहे.

प्रत्येक गल्लीत दहशत!
आजच्या घडीला शहरातील प्रत्येक गल्लीत भटक्‍या कुत्र्यांची दहशत आहे. या कुत्र्यांवर थेट इलाज करणे महापालिकेच्या हाती नसल्याने कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली केवळ उपाययोजना केल्या जात आहेत, पण त्यानंतरही कुत्र्यांची संख्या वाढतेच आहे. अशा वेळी या कुत्र्यांपासून नागरिकांना कमीत कमी आजार व्हावेत यासाठी भटक्‍या कुत्र्यांच्या औषधोपचारासाठी महापालिकेने तीन वर्षांत नव्वद लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.  

४० हजार - २००४ मध्ये नसबंदी सुरू झाली तेव्हाची संख्या
६० लाख - नसबंदीवरील दरमहा खर्च
३० लाख - ठाणे पालिकेचा कुत्रे चावलेल्यांवरील खर्च
७० हजार - आता भटक्‍या कुत्र्यांची संख्या (अंदाजे)
(नेमका आकडा पालिकेला माहिती नाही.)

*******************************************************

श्‍वानदंशाचे वाढते प्रमाण
(रवींद्र खरात)

भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न अन्य शहरांप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतही वाढत आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक, मोटार सायकल स्वार, लहान मुले यांना सर्वांत जास्त भटके कुत्रे चावल्याचे चित्र आहे.

भटक्‍या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत उपाययोजना होत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने महानगरपालिकेला अनुदान देऊन नसबंदी केंद्रांत वाढ करावी, पथक वाढवून जनजागृतीसाठी आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.

राज्य शासनामार्फत दर पाच वर्षांने पशुगणना केली जाते. कल्याण पंचायत समितीने शासनाच्या आदेशानुसार सन २००७ मध्ये पशु गणना केली असता शहरी भागात १८ हजार ५३४; तर ग्रामीण भागात चार हजार ५३१ कुत्रे असे एकूण २३ हजार ६५ संख्या होती. २०१२ च्या पशुगणनेत शहरी भागात १९ हजार सहा कुत्र्यांची संख्या समोर आली आहे. २०१७ ला पशुगणना होणे अपेक्षित होते; मात्र ती न झाल्याने अंदाजे ती संख्या ५० हजार झाल्याचा दावा प्राणिमित्र संघटना करत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्यासाठी एका खासगी संस्थेला काम देण्यात आले आहे. आपले वाहन, कर्मचाऱ्यांमार्फत भटके कुत्रे पकडून पालिकेच्या बैल बाजार येथील केंद्रावर नसबंदी करून, जिथून कुत्रे पकडून आणले तेथे पुन्हा सोडले जातात. यासाठी पालिकेने संबंधित ठेकेदाराला ८ जानेवारी २०१५ ते जून २०१८ या कालावधीत दोन कोटी १४ लाख ८१ हजार ७६ रुपये बिल अदा केले आहे.

औषधोपचार...
कुत्रा चावल्यानंतरच्या मोफत औषधोपचार केला जातो. प्रतिवर्षी ५० लाख रुपये खर्च केला जात असून २०१५ पासून आजपर्यंत अडीच ते तीन कोटी खर्च झाल्याचे समजते.
इमारत दुरुस्ती...

इमारत दुरुस्तीच्या कामामुळे मागील दोन महिने भटके कुत्रे पकडण्याचे काम बंद होते. इमारत दुरुसतीसाठी १५ लाख रुपये खर्च करण्यात आले.

संरक्षणासाठी जनजागृती
कुत्रा चावण्यापासून आपले कसे सरंक्षण करावे यासाठी विविध माध्यमांतून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

कुत्रा झोपला असेल किंवा खात असेल, पिल्लासोबत असेल तर त्याला काठी किंवा दगड मारून त्रास देऊ नये.
कुत्र्याच्या पिल्लाजवळ जाऊ नये, संरक्षणासाठी हल्ला करू शकतो.
कुत्र्याला बांधले असेल, भिंतीच्या मागे असेल, भुंकत असेल तर जवळ जाऊ नये.
कुत्र्याच्या जवळून धावू नये, तो घाबरून चावू शकतो.
कुत्र्याला सरळ नजरेने पाहू नका किंवा मागे बघून पळू नका.
जर कुत्रा घाबरून तुमच्या दिशेने धावत आला असेल तर एकाच ठिकाणी थांबा, त्याच्याकडे न पाहता जमिनीकडे पाहा आणि हळूहळू मागे सरका...

कल्याण डोंबिवलीत श्‍वानदंश
एप्रिल २०१४ ते मार्च २०१५    १०,११५
एप्रिल २०१५ ते मार्च २०१६    १०,८२३
एप्रिल २०१६ ते मार्च २०१७    १२,६५६
एप्रिल २०१७ ते मार्च २०१८    १३,४९२
एप्रिल ते ऑक्‍टोबर २०१८    ९,९१३

Web Title: Mumbai Thane KDMC street dog