मुंबई : म्हाडा कार्यालयातील सॅम्पल फ्लॅटमध्ये विकासकाने थाटले कार्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : म्हाडा कार्यालयातील सॅम्पल फ्लॅटमध्ये विकासकाने थाटले कार्यालय

मुंबई : रायगड जिल्ह्यातील तळई गावचे पुनर्वसन करण्यासाठी म्हाडाने दोन सॅम्पल फ्लॅट म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात उभारले आहेत. तळई गावचे पुनर्वसन अद्याप रखडले असताना येथील एक फ्लॅट म्हाडाने एका खाजगी विकासकाला दिला आहे. तळईच्या सॅम्पल फ्लॅट मधून विकासक एका प्रकल्पाच्या सोडतीसाठी अर्ज भरून घेत आहेत.

अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत रायगड जिल्ह्यातील तळई गाव व आजूबाजूच्या वाड्यांमधील घरे उद्ध्वस्त होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. तळई गावातील व आजूबाजूच्या पाड्यातील 261 घरांची उभारणी करून नागरिकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणावर (म्हाडा) सोपविली आहे. त्या दृष्टीने म्हाडातर्फे नियोजन करण्यात येत असून पुनर्वसन घरांचे दोन पद्धतीचे सॅम्पल फ्लॅट म्हाडामार्फत वांद्रे येथील मुख्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आले आहेत.

हेही वाचा: पुणेकरांसाठी खूशखबर! म्हाडाची ३ हजार घरांची निघणार Lottery

या सॅम्पल फ्लॅटची पहाणी तळई गावातील रहिवाशांनी केली आहे. रहिवाशांनी या फ्लॅटमध्ये काही बदल सुचवले आहेत. अद्यापही तळई गावचे पुनर्वसन रखडलेले आहे. असे असतानाही म्हाडाने एक फ्लॅट खाजगी विकासकाला भाड्याने दिला आहे. या कार्यालयातून खाजगी विकासक एका प्रकल्पातील घराची विक्री करत आहे. हा प्रकल्प पंतप्रधान आवास योजनेतील असून म्हाडाचा लोगो वापरत आहे. हा प्रकल्प 2023 मध्ये तयार होणार असून 4 हजार 100 घरांची ही सोडत असणार आहे. तळई गावचे पुनर्वसन रखडले असताना खाजगी विकासकाला सॅम्पल फ्लॅट दिल्याने म्हाडातील अधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत. याबाबत म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

loading image
go to top