Mumbai: मुंबईत घातपाताची धमकी;आरोपीला 10 तासात अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Mumbai: मुंबईत घातपाताची धमकी;आरोपीला 10 तासात अटक

मुंबई- फोनवरून मुंबईत घातपाताची धमकी देणाऱ्या तरूणाला 10 तासांत अटक करण्यात जे.जे. मार्ग पोलिसांना यश आले आहे.

नागपूर येथील रहिवासी अश्विन भारत महिसकरने असे आरोपीचे नाव आहे. जे.जे. रुग्णालय, भेंडीबाजार व नळ बाजार परिसरात बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची मुंबई पोलिसांच्या दक्षिण नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून धमकी देण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक रुपाली कदम या दक्षिण नियंत्रण कक्षात कार्यरत असताना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास एक फोन आला होता.

फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबईच्या बंदरगाह परिसरात 23 फेब्रुवारीला 90 किलो स्फोटके उतरविण्यात आली असून जे. जे. हॉस्पिटल, भेंडीबाजार, नळबाजार परिसरात स्फोटकांच्या साह्याने बॉम्बस्फोट घडवण्यात येणार असल्याचे सांगितले.

त्याने नाव न सांगता फोन कट केला. याबाबतची माहिती रुपाली कदम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिली. त्यानंतर जे.जे मार्ग पोलीस तसेच येलोगेट, कुलाबा, मरिन ड्राईव्ह, डी. बी. मार्ग या पोलीस ठाण्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली. जे जे मार्ग पोलिसांनी तपास सुरू केला.

जे जे मार्ग पोलिसांनी कॉलचे लोकेशन शोधायला सुरुवात केली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अश्विन भारत महिसकरने पालघर येथील डहाणू रेल्वे स्थानकावरून फोन केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार डहाणू पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यांनी माहितीच्या आधारे आरोपी अश्विनला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खोटी माहिती दिल्याचे मान्या केले.

त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे, अशांतता निर्माण करणे, नागरिकांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात भादवी कलम 179, 506 (2), 505 (1), 182 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

टॅग्स :Mumbai Newspolicecrime