मुंबई विद्यापीठाच्या परिक्षांच्या तारखा ठरल्या; ऑनलाईन पद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर

तेजस वाघमारे
Thursday, 10 September 2020

मुंबई विद्यापीठाने 2019-20च्या अंतिम वर्षामधील अंतिम सत्राच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने 2019-20च्या अंतिम वर्षामधील अंतिम सत्राच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परिपत्रकानुसार, नियमित परीक्षा 1 ते 17 ऑक्टोबरदरम्यान तर, बॅकलॉगच्या परीक्षा 25 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने या परिक्षा होणार असून 50 गुणांच्या लेखी परिक्षेसाठी एका तासाचा कालावधीत देण्यात येणार आहे.

कारवाई सुरूच! कंगनाच्या बंगल्यामधील बेकायदा बांधकाम पाडल्यानंतर आता खार येथील घरावर हातोडा?

विद्यापीठाने ऑनलाईन परिक्षा घेण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. महाविद्यालयांचे समूह करून परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच अंतिम वर्षाची लेखी परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या (एमसीक्यू) स्वरुपात घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना पुनर्मुल्यांकनाची सुविधा उपलब्ध नसेल, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.  
अंतिम सत्राच्या सर्व परीक्षा 13 मार्चपर्यंत महाविद्यालयांत शिकवलेल्या अभ्यासक्रमावर आधारीत असतील. विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी प्रश्नसंच दिले जातील व सराव परीक्षाही करून घेतल्या जाणार आहेत. परीक्षांच्या योग्य आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे समूह तयार केले असून त्यातील एकास मुख्य महाविद्यालय म्हणून जबाबदारी पार पाडावयाची आहे.  ऑनलाईन लेखी परीक्षांसाठीचे वेळापत्रक हे मुख्य महाविद्यालयाने इतर महाविद्यालयांशी चर्चा करून ठरवायचे आहे. 

आमच्या प्रयत्नांवर पाणी फेरले; आघाडी सरकारवर फडणवीस यांची टीका

अपरिहार्य कारणांमुळे ऑनलाईन लेखी परीक्षा देऊ शकणार नाही, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्याविषयी मुख्य महाविद्यालयमार्फत एकत्रित निर्णय घेण्यात येईल. तसेच, ज्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षा झाल्या आहेत त्यांच्या परीक्षा पुन्हा होणार नाहीत. अंतिम सत्र किंवा बॅकलॉगचे प्रात्यक्षिक, अहवाल आणि मौखिक परिक्षा 15 सप्टेंबरपासून घेण्याच्या सूचनाही विद्यापीठाने दिल्या आहेत. तसेच, अपंग विद्यार्थ्यांसाठीही परीक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा देण्याच्याही सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. 

 

कोरोनाचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि परीक्षा संबंधित सर्व घटकांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे आवश्यक तांत्रिक सुविधा नसतील तर त्याच्या आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांनी व स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी. परीक्षेदरम्यान चांगली इंटरनेट व्यवस्था देण्यासंदर्भात इंटरनेट पुरवठादारांना व अखंडीत वीज पुरवठा करावा म्हणून संबंधित घटकांना विद्यापीठामार्फत विनंती केली जाईल.
- प्रा. सुहास पेडणेकर,
कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai University exam dates set; Releases guidelines on online methods