esakal | हा वीकेंड लॉकडाउनचा परिणाम- मुंबईच्या महापौर

बोलून बातमी शोधा

हा वीकेंड लॉकडाउनचा परिणाम- मुंबईच्या महापौर

कोरोनाचं थैमान नष्ट होऊ दे असा गुढीपाडव्यानिमित्त संकल्प

हा वीकेंड लॉकडाउनचा परिणाम- मुंबईच्या महापौर
sakal_logo
By
विराज भागवत

गेले काही दिवस राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्याची स्थिती बिकट आहे. एप्रिल महिन्यात दररोज सरासरी ९ ते १० हजार कोरोनाबाधित आढळत आहेत. पण सोमवारी मात्र या रूग्णसंख्येत घट पाहायला मिळाली. सोमवारी आलेल्या आकडेवारीनुसार, त्याआधीच्या २४ तासात ६ हजार ९०० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले. या मुद्द्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपलं मत मांडलं. "कोरोनाबाबतचे नियम पाळण्याची विनंती केल्यावर 95 टक्के मुंबईकर ऐकतात, पण उरलेल्या पाच टक्क्यांमुळे बाकी लोकांना त्रास होतो. त्यामुळे लॉकडाऊन लावणं गरजेचं आहे का यावर विचार सुरू आहे. साखळी तोडण्याचं काम अतिशय महत्वाचं आहे, नाहीतर जनता धोक्यात येईल. सोमवारी रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसलं म्हणजे हा वीकेन्ड लॉकडाऊनचा परिणाम आहे", असा निष्कर्ष पेडणेकर त्यांनी काढला.

मुंबईत 'वीकेंड लॉकडाऊन'मध्ये किती जणांवर झाली कारवाई?

"आज गुढीपाडवा आहे. गेल्या वर्षी या सणाला कोरोनाचं संकट गडद होतं. या वर्षी हे संकट अधिकच गडद आहे. गुढीपाडवा हे नववर्ष आहे. गुढीपाडव्यापासून इतर सणांना सुरुवात होते. आनंदाच्या क्षणी गुढी उभारण्याची आपली परंपरा आहे. घरातल्या व्यक्तींसोबत मीदेखील गुढी उभारली आहे आणि मनोमन संकल्प केला आहे की कोरोनाचं जे संकट थैमान घालत आहे, ते लवकर नष्ट होऊ दे", असं आवाहन त्यांनी या सणाच्या निमित्ताने केलं. "गुढीपाडवा साजरा हा सर्वांकडे होतो. सध्या कोरोनाचा धोका लक्षात घेता घरातल्या घरात हा सण साजरा केला पाहिजे. या सणाच्या निमित्ताने साऱ्यांनी सकारात्मक विचारात राहा. पॉझिटिव्ह हा शब्द आता नकारार्थी झाला आहे आणि निगेटिव्ह हा शब्द होकारार्थी झाला आहे. पण नियम पाळले तर पुढचा गुढीपाडवा मुक्तपणाने आणि आनंदाने साजरा करता येईल", अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दिलासादायक! मुंबईत आज नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

"काळ्या पिवळ्या टॅक्सीमधून रुग्णांना नेलं जातंय. या वापराबाबत मला आताच समजलं. पण अशाप्रकारे रुग्णांना नेत असतील, तर ते थांबवलं पाहिजे. महापालिका क्षेत्रातील वैद्यकीय सेवांमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेड्स काढून ना नेता तेथे मिनी हॉस्पिटल्स केली जातील. लॅब्सना महापालिका मदत करेल. प्रायव्हेट गाड्या, ट्रेन, बसेस राज्यात आणि मुंबईत जेथून येत आहेत, त्या वेशींवर आणि मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर टेस्ट केल्या जात होत्या. ते पुन्हा लागू केलं जाण्याबद्दल विचार सुरू आहे. तसेच राज्यात येणाऱ्यांबाबत आणि राज्यातून बाहेर जाणाऱ्यांबाबत लवकरच नियम लावले जाणार आहेत. याबाबत चर्चा सुरू असून मुख्यमंत्री लवकरच यावर निर्णय घेतील", अशी माहिती पेडणेकर यांनी दिली.

"आधार कार्ड लिंक नसल्याने काही रूग्णांना बऱ्याच अडचणी येत आहेत असं समजलंय. त्याबाबत काम सुरू आहे. सध्या रुग्णाच्या नावाची व्यवस्थित ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी. कारण रूग्ण थेट हॉस्पिटल्समध्ये गेल्यावर त्यांना घेतलं जात नाही. त्यामुळे ठरवून दिलेली नियमावली पाळायलाच हवी", असंही त्यांनी ठणकावलं.