येत्या दोन वर्षात मुंबई होणार खड्डेमुक्त रस्ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai roads

येत्या दोन वर्षात मुंबई होणार खड्डेमुक्त रस्ते

मुंबई - मुंबई महानगरात चांगल्या दर्जाचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेल्या सुधारणा यांचा राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी शनिवारी आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला असून येत्या दोन वर्षात सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई खड्डे मुक्त होईल, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने डॉ. इकबाल सिंह चहल यांनी यावेळी माहिती देताना व्यक्त केला. तब्बल ४ हजार ९०० कोटी रूपयांचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुधारणा कामे आणि त्या अनुषंगाने केली जाणारी इतर कामे तसेच जोरदार पावसामुळे रस्त्यांवर होत असलेले खड्डे भरण्यासाठी केली जाणारी कार्यवाही यांचा एकत्रित आढावा राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त उल्हास महाले आदी अधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगरातील रस्ते सुधारणा उपाययोजनांबाबत आयुक्त चहल यांनी बैठकीत सादरीकरण केले. मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते बांधणी केली जात आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते देखील सुधारण्याच्या दृष्टीने सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला आहे. कारण सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परीरक्षणाचा खर्च देखील कमी होतो.

यंदा सन २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण काम होत आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे. तर आणखी तब्बल ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर उर्वरित ४२३.५१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण देखील पुढच्याच वर्षी म्हणजे २०२३-२०२४ मध्ये हाती घेण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे. म्हणजेच पुढील दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, याचा महानगरपालिका प्रशासनाला विश्वास आहे, असे आयुक्तांनी बैठकीत नमूद केले.

यापुढे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करताना ठराविक अंतरावर पाण्याचा निचरा करणारे शोषखड्डे देखील तयार केले जाणार आहेत, त्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवणार नाही. सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांच्या नवीन निविदांमध्ये त्यादृष्टीने अटींचा समावेश देखील करण्यात आला आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करताना महानगरपालिका प्रशासनाने नवीन निविदांमध्ये नावीन्यपूर्ण व महत्त्वाच्या अटींचा समावेश केला आहे. जोरदार पावसामुळे आणि विशेषतः सखल भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता वेगवेगळ्या उपाययोजना महानगरपालिकेतर्फे केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करताना ठराविक अंतरावर शोष खड्डे देखील तयार केले जाणार आहेत, जेणेकरून त्याद्वारे पाण्याचा निचरा सहजपणे होऊ शकेल आणि पुराचे पाणी रस्त्यावर येणार नाही. नवीन कामांच्या निविदांमध्ये यादृष्टीने अट देखील समाविष्ट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये आणि प्रमुख अभियंता (रस्ते), उपप्रमुख अभियंता (रस्ते) यांच्या कार्यालयाला देखील जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला या रस्त्यांवर थेट नजर ठेवता येईल.

४ हजार ९०० कोटींचा खर्च

मुंबईत यंदा ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची जी कामे प्रस्तावित आहेत, त्यामध्ये - शहर विभागात ५० किलोमीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ८०० कोटी, पूर्व उपनगरात ७५ किलोमीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ६०० कोटी तर पश्चिम उपनगरात २७५ किलोमीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ३ हजार ५०० कोटी असा एकूण ४ हजार ९०० कोटींचा खर्च करावा लागणार आहे. यामध्ये १३.४० मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण पॅसेजमध्ये (२०० मिलिमीटर जाड काँक्रिट थराचा रस्ता) करण्यात येतील. तर १३.४० मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांची सुधारणा (२८० मिलिमीटर जाड काँक्रिट थर) सिमेंट काँक्रिटीकरणमध्ये करण्यात येईल.

Web Title: Mumbai Will Have Pothole Free Roads In The Next Two Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MumbaiBad Roadpotholes