#MumbaiIssues मुंबईकरांचे स्पिरीट सोडा... सुरक्षेचे बोला!

#MumbaiIssues मुंबईकरांचे स्पिरीट सोडा... सुरक्षेचे बोला!

मुंबई - मुंबईत रोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत आणि माणसे किड्यामुंग्यांप्रमाणे मरत आहेत. ‘हादसों का शहर’ अशी मुंबईची ओळख वाढू लागलीय. रोजच मृत्यूच्या सावटाखाली पोट भरण्यासाठी जगणाऱ्या मुंबईच्या स्पिरीटचे नेहमी कौतुक होत असले, तरी आता मुंबईकर संतापला आहे. मुंबईच्या स्पिरीटचे कौतुक बस्स झाले. किमान सुरक्षित जगणे तरी आमच्या नशिबी आहे का, असा सवाल आता सेलिब्रेटींसह सामान्य नागरिकही विचारू लागले आहेत.

मंगळवारी (ता. ३) सकाळी अंधेरीत गोखले पुलाची मार्गिका रेल्वेस्थानकावर कोसळून पाच जण जखमी झाले. त्यानंतर पश्‍चिम रेल्वे ठप्पच पडली. अशातच रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईचे रूपांतर तलावात झाले. मध्य आणि हार्बर रेल्वे काही काळ रखडली होती. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी पुलाच्या दुर्घटनेनंतर ट्विट करून संताप व्यक्त केला.  गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एल्फिन्स्टनची दुर्घटना झाल्यानंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रेल्वेचे पूल सुरक्षित करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र अंधेरीतील पूल कोसळल्याने त्यांचे आश्‍वासन फोलच ठरल्याचे स्पष्ट झाले. 

महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी तर पुलाची जबाबदारी रेल्वेवर ढकलली. रेल्वेने मात्र कोसळलेला पूल पालिकेचा असल्याचे ठणकावले. त्यावरून आता राजकारण सुरू झाले असून, मरणासन्न झालेली मुंबई हताश झाली आहे. त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुंबईत आम्हाला जगण्यासाठी रोजच संघर्ष करावा लागत आहे. जागतिक पातळीवरील शहरात आहोत की मागासलेल्या राष्ट्रातील एखाद्या भागात आहोत, असा प्रश्‍न पडतो. 
- शर्ली एम., नालासोपारा

मुंबईची स्थिती खूप बिकट झाली आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे सरकारची जवाबदारी आहे. आता किती आणि कधीपर्यंत सहन करायचे?
- अमानत उल्लाह खान, वकील

मुंबईचे स्पिरीट वगैरे ठीक आहे; पण सुरक्षेचे काय? मुंबईकर काही घरी बसून राहू शकत नाही. कामासाठी त्यांना बाहेर पडावेच लागते. आता तरी सरकारने घ्यायला हवी.
- रश्‍मी खामकर, मुलुंड 

राजकीय पक्षांनीही आपापसातील राजकारण बाजूला ठेवून पुलांचे ऑडिट आणि रस्त्यांची पाहणी करायला हवी. प्रशासनाला त्यांची कामे करायला काय होते?
- हेमंत झुंजारे, कुर्ला

पादचारी पूल कोसळतात, आग लागते, मॅनहोलमध्ये पडून आयुष्याला मुकतो; शॉर्टसर्किट होऊन दगावतो. सरकार मात्र आपली जबाबदारी झटकण्याची कामे करते. 
- डॉ. आशीष भोसले

रेणुका शहाणे यांचे ट्विट
मुंबईकडून फक्त घेतलं जातं! जेवढी लोकसंख्या आहे त्या मानाने मुंबईसाठी दिले जाणारे पैसे नेहमीच कमी असतात ही खंत आहे. आर्थिक राजधानीला तिचा हक्क मिळतो का? मुंबईकरांचे आयुष्य कधी सुखकर होणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com