esakal | सावधान!! मुंबईसाठी पुढील १५ दिवस महत्त्वाचे; समजून घ्या कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Medical Treatment

सावधान!! मुंबईसाठी पुढील १५ दिवस महत्त्वाचे; समजून घ्या कारण

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: सध्या राज्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मुंबईला या निर्बंधांचा काही अंशी फायदा झाल्याचं चित्र आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कडक निर्बंध लागू केल्यानंतर रोज कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ ही ८ ते १० हजारांच्या टप्प्यात स्थिरावली आहे. मात्र ही कोरोनाची दुसरी लाट असल्याने पुढील १५ दिवस हे मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. एप्रिल अखेरीपर्यंत कोरोनाबाधितांचा रोजचा आकडा थोडा कमी होण्याची शक्यता आहे. परंतु, आजपासून पुढील १५ दिवसांचा काळ हा मुंबईकरांसाठी कसोटीचा असणार आहे, असं मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय गेल्या काही दिवसात केलेल्या मिनी लॉकडाउन, नाइट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाउनमुळे रूग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचा दरही २६ टक्क्यांवरून घसरून १५ टक्क्यांवर आला असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा: डोंबिवलीत घरातच सुरू होता ड्रग्सचा कारखाना; NCBने केली कारवाई

लॉकडाउन किंवा तत्सम निर्बंध लादण्याआधी राज्यात कोरोना रूग्णांचे प्रमाण बरेच वाढले होते. त्यातील अनेक रूग्णांवर आताही उपचार सुरू आहेत. रूग्णांची संख्या आणि त्यांना लागणाऱ्या वैद्यकीय सेवा यांचे नियोजन करताना महापालिका प्रशासनाची तारांबळ उडताना दिसत आहे. त्यामुळेच महापालिका प्रशासनाकडून सहा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. वैद्यकीय ऑक्सिजनचे पुरवठादार, पालिकेच्या २४ वॉर्डचे सहआयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन या तीन विभागांमध्ये समन्वय राखण्याचे कार्य या सहा अधिकाऱ्यांवर असणार आहे, असंही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. राज्यात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्यावर नियंत्रण ठेवणं आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर याची जबाबदारी या सहा अधिकाऱ्यांकडे असेल. सध्या राज्यात खासगी आणि सरकारी अशी एकूण १५० रूग्णालये कोविड रूग्णांवर उपचार करत आहेत.

हेही वाचा: मुंबईत बनवली जाणार कोरोनावरील लस

"कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी रोजची वाढ ही सध्या ८ ते १० हजारांच्या घरात स्थिर झाली आहे. ही बाब काही अंशी दिलासादायक असली तरी पुढचे १५ दिवस हे अतिशय महत्त्वाचे आहेत. रूग्णसंख्येत होणारी वाढ आणि ऑक्सिजनचा मर्यादित पुरवठा यांचा समतोल राखण्यासाठी यंत्रणा असणं आवश्यक आहे. सध्याच्या घडीला मुंबईतील सर्व हॉस्पिटल्सध्ये मिळून २३५ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवला जातो. पण रूग्णसंख्या वाढीकडे पाहता लवकरच अधिक ऑक्सिजनची गरज भासेल", असे मत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केलं.

loading image
go to top