#MumbaiRains पावसाने मुंबईची केली नदी; नागरिकांचा होडीने प्रवास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

मुंबईतील काही भागात इतके जास्त पाणी साचले आहे की पोरांना पोहण्यासाठी जणू एक नवीन छोटा तलावत उपलब्ध झाला आहे. काहीजण पोहत आहे तर काहीजण दैनंदिन कामासाठी होडीचा वापर करत आहे.

मुंबई - आज (सोमवार 9 जुलै) मुंबईत जागोजागी पाणी साचले आहे. पावसाचे पाणी साचणे ही काही मुंबईसाठी नवीन गोष्टं नाही. परंतू सतत धावणारी मुंबई पावसामुळे मात्र काहीशी मंदावली आहे. मुंबईतील काही भागात इतके जास्त पाणी साचले आहे की पोरांना पोहण्यासाठी जणू एक नवीन छोटा तलावत उपलब्ध झाला आहे. काहीजण पोहत आहे तर काहीजण दैनंदिन कामासाठी होडीचा वापर करत आहे. पाणी तुंबल्याने गाड्यांनी प्रवास करणे अशक्य झाल्याने होडीने प्रवास करण्याची युक्ती मुंबईकरांनी शोधून काढली आहे.

मुसळधार पाऊस आणि तुंबलेले पाणी यामुळे मुंबईत कुठे काय परिस्थिती - 

मुसळधार पावसामुळे सोमवार (ता. 9 जुलै) ला शिवडी क्रॉस रोड येथील आर. ए. किडवाई मार्ग चार रस्ता या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी दैनंदिन कामासाठी अनोखी शक्कल लढवत लाकडी फळ्या, प्लास्टिक बॅरिकेट आणि वाहनच्या टायर ट्युबचा वापर करून स्वतः तयार केलेल्या होडीचा वापर करण्यास सुरवात केली आहे. मात्र तारेवरची कसरत करत काम करावे लागले असले तरी मोठ्या उत्साहाने नागरिक या परिस्थितीला सामोरे जात आहेत. तर अनेक नागरिकांसह बच्चेकंपनीने या साचलेल्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटला.

देवनार मनपा वसाहती लगत श्रीमान बाळासाहेब ठाकरे उद्यानात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. या पाण्यात परीसरातील बच्चे कंपनीने रिसॉर्टचा आनंद घेतला.

वडाळा पूर्व येथील बीपीटी वसाहत पूर्णतः पाण्याखाली गेली असून येथील रहिवाशांना तारेवरची कसरत करत दैनंदिन कामे करावी लागत आहेत. तर वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीपीटीत यंदा पाणी भरू नये म्हणून 32 हॉर्स पावरची कार्यक्षमता असलेले पंप पाण्याचा निचरा होण्यासाठी वसाहतीतील मुख्य रस्त्याच्या कडेला लावण्यात आले आहेत. परंतु रविवार आणि सोमवारी पडत असलेल्या सततच्या पावसामुळे हे पंप देखील कुचकामी ठरले आहेत. यामुळे नागरिकामधून संताप व्यक्त होत आहे.

सततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्याने शाळा सुटल्यावर घरी जायला निघालेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. मुलांना घरी नेण्याकरता पालकांनी शाळेबाहेर गर्दी केल्याने कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेबाहेर काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.
 

जुई नगर-बेलापूर-पनवेल मार्गावर खड्डेच खड्डे असल्याने आणि पावसाचे पाणी त्यात साचत असल्याने वाहन चालक प्रचंड त्रस्त झाले होते. 

पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी भरल्याने गावाशी संपर्क तुटला. मुसळधार पावसामुळे शाळा परिसरात पाणी भरल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली.
पहटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बोर्डी, घोलवड परिसर जलमय झाला आहे. तलाव, नदी, नाले तुडूंब भरले असून शेती पाण्याखाली आली असल्याने कामात व्यत्यय आला आहे. मागील चोवीस तासात 175 मिमी तर चालु हंगामात 1125 मिमी पावसाची नोंद येथे झाली आहे.रविवारी पहाटे पासून या परिसरात पावसाची संततधार सुरु झाली होती. दुपारी 4 वाजता नंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र रविवारी मध्यरात्री पासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. सोमवार सकाळी संततधार सुरुच होती. दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली. तत्पुर्वी शेती पाण्याखाली आल्याने शेतीची कामे बंद पडली होती. उंबरगाव औद्योगिक वसाहतीत सुट्टी असल्याने कामगारांना दिलासा मिळाला. बोर्डी, घोलवड गावातील रस्त्यांना नद्याचे स्वरुप आले होते. धोकादायक खुटखाडी पुलावर पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने लहान वाहानांची वाहतूक धिम्या गतीने सुरु होती.    
रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना अर्ध्या रस्त्यातून परत यावे लागले. 12 वाजता पर्यंत पावसाचा जोर कायम असून ग्रामस्थांनी घरात राहणेच पसंत केल्याने दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे.

सततधार पावसामुळे गाढी नदी पात्रात पुर आल्याने टेमघर-उमरोली गावातील पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासुन आतापर्यंत तिसऱ्यांदा गावाचा संपर्क तुटला आहे. दरवर्षी या भादटगात पूरस्थिती निर्माण होत असल्याने गावात जाण्याकरीत नवा पुल बांधुन द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. प्रशासनाकडून मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

पावसात मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 2 व 3 वर धबधबा कोसळत आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: #MumbaiRains people uses boat to travel in mumbai rain