मुसळधारेतही गोविंदांचे थरावर थर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

रविवारी कोसळणाऱ्या पावसाच्या विघ्नावर मात करत मुंबईतील गोविंदा पथकांचा थर रचण्याचा कसून सराव...

मुंबई : गोपाळकालाला अवघे २० दिवस बाकी आहेत. त्यामुळे गोविंदा पथकांनीदेखील कसून सरावाला सुरुवात केली आहे. गोविंद पथकांचा सराव प्रामुख्याने शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान होतो. या दोन दिवशी इतर दिवसांपेक्षा जास्त सराव केला जातो. परंतु, गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोविंदाच्या सरावामध्ये पावसाचे विघ्न निर्माण होते की काय, अशी परिस्थिती उद्‌भवण्याची शक्‍यता होती. पण पावसाचे आव्हान स्वीकारून गोविंदा पथकांनी शनिवारी आणि रविवारी कसून सराव केला.

सुरक्षित थर लावण्यासाठी सरावाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पावसाचे कारण पुढे करून सराव बंद ठेवणे शक्‍य नाही. गोविंदाला अवघे १५ ते २० दिवस राहिले आहेत. त्यामुळे विकेंडला कसून सराव झालाच पाहिजे. म्हणून जेवढी मुले उपस्थित होती, तेवढ्यांकडून दुपारी १२ ते ६ या वेळेत थरांचा सराव करून घेतला, असे ताडवाडी गोविंदा पथकाचे प्रशिक्षण अरुण पाटील यांनी सांगितले. 

आम्ही कधीच किती थर लावणार असे काही ठरवत नाही. नऊ थर सुरक्षित लावण्याचा पहिला विक्रम आमच्या पथकाचा आहे, म्हणून नेहमी नऊ थर लावू अशा भ्रमात आम्ही राहत नाही. सरावात जेवढे थर लावणे शक्‍य आहे, तेवढेच थर लावणार आहोत असे पाटील म्हणाले. 

आमचा दररोज रात्रीचा न चुकता सराव सुरू आहे. पाऊस असला तरी आम्ही सरावामध्ये खंड पडून दिला नाही. आता नऊ थर लावण्याचा सराव सुरू आहे. तो जर यशस्वी झाला, तर त्या पुढील थरांचा विचार करू. दररोज सातत्याने सराव सुरू आहे, अशी जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी माहिती दिली. 

दोन दिवस खूप पाऊस पडतोय, पण मुलांना शनिवार-रविवारीच सुट्टी असते. त्यामुळे पाऊस असूनही आम्ही सकाळी ११ ते दुपारी २.३० पर्यंत सराव केला. या वर्षीही आठ थर लावण्याचा मानस आहे. त्यासाठी कसून सराव सुरू आहे.
- कमलेश भोईर, उमरखाडी गोविंदा पथक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai's Govinda practice dahihandi even in heavy rains