वन रुपी क्‍लिनिक बंद पडताहेत!

पनवेलमधील बंद असलेले वन रुपी क्‍लिनिक
पनवेलमधील बंद असलेले वन रुपी क्‍लिनिक

मुंबई : अवघ्या एका रुपयात रुग्णांची तपासणी करणारी आणि म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘वन रुपी क्‍लिनिक’ वैद्यकीय सेवा सर्वच रेल्वेस्थानकांवर सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी होत असतानाच, काही स्थानकांवर असलेली सेवा केवळ रेल्वे प्रशासनाची बेपर्वा वृत्ती आणि समाजकंटकांचा त्रास यामुळे बंद करावी लागल्याचे वास्तव समोर आले आहे. पनवेलसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकावर तर हा दवाखाना अद्याप सुरूच होऊ शकलेला नाही, तर शीव स्थानकातील केंद्र केवळ रेल्वेच्या प्रशासकीय अनास्थेमुळे बंद करण्याची वेळ आली आहे.
  
‘वन रुपी क्‍लिनिक’ ही ‘मॅजिक दिल’ या कंपनीचे डॉ. राहुल घुले आणि त्यांचे सहकारी यांची संकल्पना. महामुंबईत रेल्वे स्थानकांसारख्या गर्दीच्या ठिकाणी केवळ तातडीचे उपचार मिळत नसल्याने अपघातग्रस्तांना प्राण गमवावे लागतात. त्या ठिकाणी योग्य प्रथमोपचार मिळत नाहीत. तसेच सामान्यांना साध्या तपासणीसाठीही किमान शंभर-दोनशे रुपये डॉक्‍टरांना मोजावे लागतात. हे पाहून केवळ एक रुपयात रुग्णांची तपासणी करणारे, अत्यंत रास्त दरांत त्यांच्या अन्य वैद्यकीय तपासण्या करणारे वन रुपी क्‍लिनिक सुरू करण्याचा निर्णय डॉ. घुले यांनी घेतला. त्यानुसार मुंबई आणि परिसरातील १५ स्थानकांत हे दवाखाने सुरू करण्यात आले. यापैकी काही दवाखान्यांना ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी भेट दिल्यावर तेथे नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असल्याचे दिसले.
 
पनवेल स्थानक परिसरात दवाखान्याची इमारत उभी आहे; मात्र तेथे केवळ दवाखान्याचा फलक लटकलेला आहे. इमारतीचा वापर मद्यपी करताना दिसतात. 

शीव स्थानकातील दवाखाना उघडा असतो; परंतु तेथे डॉक्‍टरांचा पत्ता नसतो. तेथील कर्मचाऱ्यांकडे याबाबत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने चौकशी केली असता, समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यासंदर्भात डॉ. घुले यांनी सांगितले, की शीव येथील दवाखान्याची जागा दूर धारावी रस्त्यावर आहे. तेथे गर्दुल्ल्यांचा त्रास होतो. रुग्णही कमी येतात. त्यामुळे ते केंद्र चालवणे परवडत नाही. 

सुरू असलेली क्‍लिनिक 
ग्रॅंट रोड, भांडुप, कुर्ला, शीव, चेंबूर, मानखुर्द, ठाणे, कळवा, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, टिटवाळा, विरार, नालासोपारा व पालघर.

पाहणीतील वास्तव
नवी मुंबई : वाशी रेल्वेस्थानकाबाहेरील वन रुपी क्‍लिनिकला टाळे. त्या जागी आता खासगी रुग्णालयाचे क्‍लिनिक. एक रुपयाऐवजी आता २०० रुपयांत होतो उपचार; मात्र रेल्वेने पायाभूत सुविधा दिल्यामुळे रेल्वे अपघातातील रुग्णांवर मोफत उपचार. रेल्वेने वन रुपी क्‍लिनिक बंद केल्यामुळे प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी.

डॉक्‍टरची नेमणूक नाही
पनवेल : पनवेल रेल्वेस्थानकात वर्षभरापूर्वी वन रुपी क्‍लिनिक सुरू करण्यासाठी इमारतीची उभारणी; मात्र एमबीबीएस डॉक्‍टरची नेमणूक न केल्यामुळे क्‍लिनिक अद्याप सुरू झालेले नसल्याचे रेल्वेचे म्हणणे. क्‍लिनिकच्या इमारतीचा वापर आता मद्यपींकडून.

ठाण्‍यात उत्तम सुविधा
ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक दोनच्या बाहेर ऑक्‍टोबर २०१५ मध्ये वन रुपी क्‍लिनिक सुरू. दिवसाला शंभरच्या आसपास रुग्ण तपासण्यासाठी क्‍लिनिकमध्ये. एमबीबीएस, एमडी डॉक्‍टरांकडून रुग्णांची तपासणी. क्‍लिनिकच्या बाहेरच जेनेरिक औषधालय. सुविधेबद्दल रुग्णांकडून समाधान व्यक्त.

खासगी डॉक्‍टरांकडे गेलो, तर केवळ तपासणीसाठी आजकाल २०० ते ५०० रुपये घेतात. सरकारी रुग्णालयांतही १० रुपयांचा केसपेपर काढा, रांगा लावा मग ते उपचार करून घ्यावा; त्यापेक्षा येथे एक रुपयात तपासणी केली जाते. आवश्‍यक तपासण्याही कमी पैशांत होतात. म्हणून आम्ही येथे येतो. 
- स्वाती सातपुते, 
एका रुग्णाच्या नातेवाईक, ठाणे

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वन रुपी क्‍लिनिकची सुविधा आहे. साडेतीन हजार रुग्ण महिन्याला या सेवेचा लाभ घेत आहेत. एका क्‍लिनिकमध्ये दिवसाला १०० ते १२५ रुग्णांची तपासणी केली जाते. तसेच रेल्वे प्रवासादरम्यान जखमी झालेले रुग्णांची संख्याही दिवसाला सहा ते सात असून महिन्याला सुमारे २०० रुग्णांवर उपचार केले जातात.
- डॉ. राहुल घुले, संचालक, वन रुपी क्‍लिनिक

रेल्वे अधिकारी म्हणतात...
वन रुपी क्‍लिनिकमध्ये काम करणे एमबीबीएस डॉक्‍टरांना परवडत नव्हते. एमबीबीएस डॉक्‍टर येत नसल्याने रेल्वेने धोरण बदलले. आता बिगर एमबीबीएस डॉक्‍टरच्या सेवेवर प्रवासी खुश आहेत, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

ग्रॅंट रोड : फलाट क्रमांक एकच्या बाहेर क्‍लिनिक आहे. तिथे दरफलक लावले आहेत. डॉक्‍टर आणि सर्व उपकरणेही दिसून आली. 

शीव : जागा योग्य नसल्याने क्‍लिनिक बंद करण्याची नोटीस ‘मॅजिक दिल’ने रेल्वेला २८ जूनला दिली. केंद्र अद्याप सुरू आहे; मात्र डॉक्‍टर उपस्थित नसतात. 

गोवंडी : क्‍लिनिक सुरू करण्यासाठी १० जुलैला निविदा उघडण्यात आल्या. १ ऑगस्टपर्यंत ते सुरू होण्याची शक्‍यता व्‍यक्‍त करण्‍यात आली.

वडाळा रोड, मुलुंड, विक्रोळी आणि एलटीटी : एमबीबीएस डॉक्‍टर नसल्याने क्‍लिनिक बंद. घाटकोपर आणि भायखळा येथेही क्‍लिनिक बंद आहे.

पनवेलमधील बंद असलेले वन रुपी क्‍लिनिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com