मुंब्रा बायपासचा दुरुस्ती खर्च खड्ड्यात

मुंब्रा बायपास येथील उड्डाण पुलावरील रस्त्याच्या निघालेल्या सळया.
मुंब्रा बायपास येथील उड्डाण पुलावरील रस्त्याच्या निघालेल्या सळया.

ठाणे : ठाणे-पनवेल मार्गावरील मुंब्रा बायपास रेतीबंदर येथील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे गेल्या वर्षी चार महिने हा मार्ग बंद करून करण्यात आलेले दुरुस्ती काम अवघ्या वर्षभरात कुचकामी ठरले आहे. सुमारे पाच कोटींचे काम, त्यानंतर रस्त्याच्या मजबुतीसाठी पावणेपाच कोटी खर्च असा सुमारे १० कोटींच्या आसपास खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल विभागाकडून करण्यात आला होता, परंतु या दुरुस्तीला अवघे १० महिने उलटले नाही, तोच या मार्गाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. बायपासवरील गतिरोधक झिजून नष्ट झाले आहेत; तर रेल्वे पुलावरून वाहने गेल्यास पुलाला हादरे बसत असल्याचे वाहनचालक सांगतात.

मुंब्रा बायपास रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५ मे २०१८ पासून १० सप्टेंबर २०१८ या चार महिन्यांच्या कालावधीसाठी या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे ठाणे शहर कोंडीने व्यापून गेले होते. ठाणे-बेलापूर आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरही अभूतपूर्व कोंडी सहन करावी लागली. बायपास रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हा मनस्ताप ठाणे, नवी मुंबई, भिवंडीसह राज्यातील आणि परराज्यांतील अवजड वाहतूकदारांनी सहनही केला. या दुरुस्ती कामानंतर पुढील काही वर्षे तरी या भागात नव्याने दुरुस्ती काम करण्याची गरज निर्माण होणार नाही, असा कयास बांधला जात होता, परंतु अवघ्या १० महिन्यांमध्येच मुंब्रा बायपास दुर्दशेच्या फेऱ्यात अडकला आहे.

संपूर्ण काँक्रीट रस्त्यावरील खडी पावसाने वाहून गेल्याने रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. मुंब्रा रेतीबंदरकडील उड्डाणपुलाच्या बाजूला सात ते आठ ठिकाणी काँक्रीटचा संपूर्ण थर निघून गेल्यामुळे पुलाच्या सळ्या उघड्या पडल्या आहेत. या सळ्या वाहनांमध्ये अडखळत असून त्यामुळे त्या अधिकच उखडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यावर पांघरूण घालण्याचाही प्रयत्न केला जातो, परंतु सकाळी त्या ठिकाणी दुरुस्ती केल्यानंतर दुपारी पुन्हा या सळ्या उघड्या पडत असल्याने यंत्रणांची थुकपट्टी उघडी पडत आहे. छोटीशी चूक थेट मृत्यूशी गाठ ठरू शकते, असे येथून दररोज प्रवास करणारे दुचाकीस्वार सांगतात.

अवजड वाहनांची कोंडी
नवी मुंबईच्या उरण येथील जेएनपीटी बंदरावरून अहमदाबाद, नाशिक, पालघर आणि भिवंडीकडे जाणारी अनेक अवजड वाहने याच भागातून प्रवास करतात. या अवजड वाहनांमुळे आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील वाहने अडकून पडतता. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी ही कोंडी अधिकच तीव्र होत असल्यामुळे वाहनचालकांचा मनस्ताप कायम आहे. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास त्यांच्याकडून याविषयी बोलण्यास नकार दिला जातो; तर पनवेल विभागातील वरिष्ठ आणि कनिष्ठांमध्ये टोलवाटोलवी सुरू असल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com