पालिका सफाई कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

तुर्भे - नवी मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्‍यक साधने मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हातमोजे, गमबूट, मास्क अशा किमान सुविधाही त्यांना पुरवल्या जात नसल्याने या कामगारांमध्ये कर्करोग, त्वचारोग, टीबी, श्‍वसनविकाराचे प्रमाण वाढत आहे, असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.

तुर्भे - नवी मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना सुरक्षेची आवश्‍यक साधने मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हातमोजे, गमबूट, मास्क अशा किमान सुविधाही त्यांना पुरवल्या जात नसल्याने या कामगारांमध्ये कर्करोग, त्वचारोग, टीबी, श्‍वसनविकाराचे प्रमाण वाढत आहे, असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.

पालिकेत चार हजार ५०० कंत्राटी सफाई कामगार आहेत. शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या या कामगारांना सुरक्षेची कोणतीही साधने न देता केवळ पगारावर त्यांची बोळवण केली जाते. झोपडपट्टी, रस्ते, पदपथ यांची ते सफाई करत असतात. सतत घाणीत काम करत असल्याने यातील अनेकांना टीबीची लागण होते. त्यांच्या आरोग्यासाठीच्या पालिकेच्या अनेक योजना केवळ कागदावरच आहेत. त्यांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नाही, असा आरोप समाज समता कामगार संघटनांनी केला आहे. अनेक कामगार पालिका रुग्णालयात कर्करोग व टीबीसारख्या आजारांवर उपचार घेत आहेत. त्यांना आरोग्य सेवा सुविधा मिळण्यातही अडचणी येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत पालिका अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

सफाई कामगारांना आरोग्य सुविधा पुरवणे हे कंत्राटदाराचे काम नसून ती जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, प्रशासन आपली जबाबदारी झटत आहे. त्यामुळे अनेक सफाई कामगार आजारांनी ग्रासले आहेत. पालिकेकडून कंत्राटदाराला तुटपुंजे पैसे दिले जात असल्याने ते कामगारांना रेनकोट, गणवेश, गमबूट आदी सुविधा देऊ शकत नाही.
- मंगेश लाड, सरचिटणीस, समाज समता कामगार संघ 

पालिकेकडून सफाई कामगारांना आरोग्याच्या सर्व सुविधा मोफत दिल्या जाव्यात. त्यांनी ओळखपत्र दाखवल्यावर त्यांच्याकडून केस पेपरचे पैसे घेऊ नये. याशिवाय इतर सर्व तपासण्या मोफत करण्यात याव्यात. 
- प्रदीप वाघमारे, कामगार नेते

साबण, टॉवेल, मास्कचा अभाव
घाणीत काम करत असल्याने कामगारांना गणवेश, साबण, टॉवेल, मास्क; तसेच पावसाळ्यात गमबूट, रेनकोट देणे पालिकेला बंधनकारक आहे. मात्र, या सुविधा त्यांना मिळत नाहीत. आजही अनेक सफाई कामगार भरपावसात कोणत्याही सुविधा मिळत नसताना हाताने घाण साफ करत आहेत. यामुळे नवी मुंबई शहराचे आरोग्य सुदृढ ठेवणाऱ्या या सफाई कामगारांचे आरोग्य मात्र वाऱ्यावर आहे.

Web Title: municipal cleaning workers Security