परिवहन समितीसाठी रस्सीखेच सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

महापालिकेच्या परिवहन समितीवरून निवृत्त होणाऱ्या सहा सदस्यांच्या जागी आपली वर्णी लागावी, याकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

नवी मुंबई -  महापालिकेच्या परिवहन समितीवरून निवृत्त होणाऱ्या सहा सदस्यांच्या जागी आपली वर्णी लागावी, याकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. रिक्त होणाऱ्या या जागांवर सामाजिक सदस्य नियुक्त करता येणार आहेत. सहा जागांपैकी राष्ट्रवादीकडे तीन, शिवसेनेकडे २; तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आली आहे; परंतु एका जागेसाठीही काँग्रेसमध्ये तब्बल ११ जणांनी त्यांची नावे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्याकडे कळवली आहेत. 

परिवहन समितीवरून शिवसेनेचे सदस्य विसाजी लोके, राजेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे विरेश सिंग, साबू डॅनियल, प्रदीप गवस आणि काँग्रेसचे सदस्य रामचंद्र दळवी निवृत्त होणार आहेत. खुद्द सभापती निवृत्त होणार असल्याने पुन्हा एकदा नवीन परिवहन समिती सभापती नियुक्त केले जाणार आहेत.    

तसेच पुढील वर्षी महापालिका निवडणुका होणार असल्याने नगरसेवकपदी इच्छुक असलेल्यांना परिवहन समिती सदस्य पदी निवड झाल्यास मिरवता येणार आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये आपल्या नावाची वर्णी लागावी, याकरिता वरिष्ठांची मनधरणी सुरू आहे.

काँग्रेसच्या वाट्याला एक जागा असतानाही तब्बल ११  इच्छुकांची यादी जिल्हाध्यक्षांकडे आली आहे. त्यापैकी एकाची निवड करताना अनेकांची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे. शिवसेनेने त्यांची यादी गोपनीय ठेवली असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या सदस्यांच्या नावाची चर्चा अद्याप सुरू केलेली नाही; मात्र समाजमाध्यमांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बाजू परखडपणे मांडणाऱ्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऐरोली विधानसभेचे अध्यक्ष व सोशल मीडियाप्रमुख राहुल शिंदे यांनी परिवहन सदस्यपदावर इच्छा व्यक्त केल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

अशी होणार निवड
सर्वसाधारणसभेच्या कामकाजात महापौरांमार्फत निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्याच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. सहा जागांसाठी जर सहा नावे आली, तर बिनविरोध निवड होईल; परंतु जास्त नावे आल्यास सभागृहातील सर्वपक्षीय सदस्य हात वर करून सदस्यांची निवड करतील. त्यामुळे काही इच्छुकांची आतापासूनच सूचक अनुमोदक शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal corporation transport committee