कोरोनाच्या संकटात वृक्षछाटणीचेही पालिका शुल्क आकारणार! मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे करावा लागणार अर्ज

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 21 मे 2020

  • कोरोनाच्या संकटातही सशुल्क वृक्ष छाटणी
  • मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे करावा लागणार अर्ज

मुंबई: पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांच्या छाटणीसाठी महापालिकेच्या मोबाईल अॅप्लिकेशन वरुन अर्ज करता येणार आहे. पालिकेच्या कंत्राटादारामार्फत वृक्षछाटणी करायची असल्यास त्याबाबतचे शुल्क महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात भरावे लागणार आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी 50-30 चा फॉर्म्युला? वैज्ञानिकांनी सुचवला हा पर्याय

कोरोनाच्या साथीमुळे अनेक गृहनिर्माण संस्थांनी सभासदांकडून मासिक आकार घेण्याचेही दोन महिन्यांपासून थांबवले आहे. मासिक खर्च बचतीतून पूर्ण केला जात असताना पालिका वृक्ष छाटणीसाठी शुल्क आकारणार आहे. एखाद्या संकुलातील वृक्ष छाटणी करायची असल्यास 
3- 4 हजारापासून लाखो शुल्क सोसायट्यांना भरावे लागल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.

पावसाळ्यापूर्वी महापालिका रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची छाटणी करते. गृहसंकुलांच्या परिसरातील झाडांची छाटणी संबंधित संस्थाना करावी लागते; मात्र त्याबाबतची परवानगी महापालिकेकडून घ्यावी लागते. ती परवानगी पालिकेच्या MCGM 24x7 मोबाईल अॅप्लिकेशनवरुन करता येणार आहे. 

गृहनिर्माण संस्थेने स्वतः झाडाची छाटणी करुन घेतल्यास तोडलेल्या फांद्याची व्हिलेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची आहे. तर पालिकेच्या कंत्राटदाराने वृक्ष छाटणी केल्यास कंत्राटारामार्फत फांद्याची विल्हेवाट लावली जाईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. पालिका नियुक्त कंत्राटदाराद्वारे झाडाची छाटणी करावयाची झाल्यास महापालिकेच्या नियमांनुसार विहित शुल्क पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे  जमा केल्यानंतर साधारणतः सात दिवसांत झाडांच्या छाटणी केली जाते.

1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वे ट्रेन्सचं बुकिंग सुरु, 'हे' आहेत नियम, 'असं' करा तिकीट बुक

 

मृत झालेल्या किंवा किडीचा प्रादुर्भाव असलेल्या झाडांबाबत अथवा सकृतदर्शनी धोकादायक झालेल्या झाडाबाबत पालिकेच्या 1916 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. तसेच विभाग कार्यालयातील कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करवून घ्यावी. 
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, महापालिका.

 

मग झाडे लावायला का सांगता? 
एकीकडे महापालिका झाडे लावा, झाडे जगवा म्हणते आणि त्याच झाडांच्या छाटणीसाठी पैसेही घेते. त्यासाठी किमान माफक शुल्क आकारावे ही आमची दरवर्षीची मागणी आहे, असे वांद्रे येथील रहिवाशी समितीच्या विद्या वैद्य यांनी सांगितले. चेंबूर येथील रहिवाशी समितीचे राजकुमार शर्मा यांनी यंदा पालिकेने मानवीय दृष्टीने विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. गृहनिर्माण संस्थानी मासिक आकार घेणे थांबवले आहे. सोसायटीच्या बचतीतून खर्च केला जात असताना पालिकेने सहानभूतीने विचार करुन मोफत वृक्ष छाटणी करुन द्यायला हवी, असे शर्मा यांनी नमूद केले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation will also charge for pruning in Corona crisis! Application has to be done through mobile application