कुटुंबे रंगलीत निवडणुकीच्या धामधुमीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

पत्नी, बहीण, मुलींनाही उमेदवारी मिळवण्यासाठी नेते प्रयत्नशील
मुंबई - निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षांच्या आजी-माजी नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आपल्यासोबत कुटुंबीयांनाही उमेदवारी मिळावी, यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

पत्नी, बहीण, मुलींनाही उमेदवारी मिळवण्यासाठी नेते प्रयत्नशील
मुंबई - निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षांच्या आजी-माजी नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आपल्यासोबत कुटुंबीयांनाही उमेदवारी मिळावी, यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई महापालिकेत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे सध्याच्या पुरुष नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्‍यता मावळली आहे. आपल्याला नाही, तर किमान पत्नी किंवा बहिणीला तरी पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकला जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. समाजवादी पक्षातर्फे अश्रफ आझमी कुर्ल्यातून लढणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. शेजारच्या प्रभागातून पत्नी दिलशाद आझमी यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेसचे ब्रायन मिरांडा वाकोल्यातून; तर पत्नीसाठी कालिना येथून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. कांजूरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून धनंजय पिसाळ यांच्या पत्नी ज्योती यांचे नाव निश्‍चित झाले आहे. भांडुपमधून अपक्ष उमेदवार आणि सध्या भाजपच्या छत्रछायेखाली असलेले मंगेश पवार हे पत्नी सारिका यांना उमेदवारी मिळावी, भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याशी सलगी वाढवत आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक चंदन शर्मा पत्नी चारू यांच्यासाठी पवई प्रभागात प्रयत्न करत आहेत.

विक्रोळी पार्कसाईट परिसरातून हारून खान यांच्या पत्नी ज्योती यांना उमेदवारी मिळाली आहे. कॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांच्यामार्फत नगरसेवक सुनील शिंदे पत्नीला नायगावमध्ये उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे क्रॉफर्ड मार्केट परिसरातील नगरसेवक गणेश सानप पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी "मातोश्री'वर फेऱ्या मारत आहेत. कॉंग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ माटुंग्यातून, तर पती उपेंद्र दोशी शीवमधील टिळक रुग्णालय परिसरातून उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी करत आहेत. शीव कोळीवाडा परिसरातून कॉंग्रेसचे माजी नगरसेवक कचरू यादव आणि पत्नी ललिता यादव शेजारच्या प्रभागातून निवडणूक लढवू इच्छित आहेत. महापौर स्नेहल आंबेकर स्वतःसोबत पती मनोहर यांनाही उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहेत.

मलिक कुटुंब रिंगणात
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे संपूर्ण कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांचे भाऊ कप्तान मलिक व बहीण डॉ. सईदा खान यांना कुर्ला येथून उमेदवारी मिळाली आहे. आता ते मुलगी सना हिला रिंगणात उतरवण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असल्याचे समजते.

Web Title: municipal election in mumbai