ठाण्यातील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

ठाण्यातील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

ठाणे : शहरातील अनेक पदपथ म्हणजे टपऱ्या उभारण्याचे ठिकाण झाले होते. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही त्यावर कारवाई होत नव्हती. याबाबतच्या तक्रारी वाढून पदपथ चालण्यासाठीही शिल्लक राहिले नसल्याची दखल घेऊन अखेर शहरातील पदपथ तीन दिवसांत मोकळे करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर आजपासून या पदपथावरील अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यास सुरुवात करण्यात आली.

विशेष म्हणजे या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होणार असल्याने सर्वच अधिकारी या अतिक्रमणविरोधी मोहिमेत सहभागी झाले होते. 

शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिंग आणि पोस्टर्सवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर प्रभाग समितीस्तरावर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ८३ हातगाड्या, ८२ बॅनर, पानटपऱ्या, चायनीज गाड्या यांच्यासह अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्यात आला.

प्रभाग स्तरावर पदपथावरील अतिक्रमणाला अभय दिले जात असल्याचा आरोप वारंवार केला जातो. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही याबाबत अनेक वेळा थेट अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते. त्या वेळी तात्पुरती कारवाई करण्यात आली होती; पण आता सर्व पदपथ मोकळे करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.

पालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांच्या मागर्दर्शनाखाली अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली. पुढील तीन दिवस ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एखाद्या प्रभाग समितीवरील अतिक्रमण त्यानंतरही कामय राहिल्यास संबंधित प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील पदपथावरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही कारवाई करण्यात येत नव्हती. त्यामुळेच केवळ एका विभागापुरती ही कारवाई मर्यादित न ठेवता सर्व शहरात ही कारवाई एकाच वेळी राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

या ठिकाणी झाली कारवाई...
बुधवारच्या धडक कारवाईत वागळे परिसरातील ५२ हातगाड्या, २० बॅनर आणि ३ अनधिकृत बांधकामे, दिवा परिसरात ७ हातगाड्या, २० बॅनर, माजिवडा परिसरात ४ प्लास्टिक शेड, २१ फेरीवाले, ११ हातगाड्या, १ ज्यूस मशीन, २ लोखंडी टपऱ्या, २ बॅनर्स, ४ पोस्टर्स हटवण्यात आले; तर वर्तकनगर परिसरात ३५ फेरीवाले, ५ हातगाड्या तोडण्यात आल्या आहेत. मुंब्रा येथे स्टेशन रोड, मुंब्रा मार्केट, आनंद कोळीवाडा मार्केट, तसेच बाबाजी पाटील वाडी ते किस्मत कॉलनीपर्यंत कारवाई करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com