शाळांमध्ये ‘इच वन टीच वन’ उपक्रम

शर्मिला वाळुंज 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

ठाणे - आधुनिक तंत्रप्रणालीच्या साह्याने पालिका शाळांतील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शैक्षणिक विकासासोबतच त्यांना स्मार्ट बनवण्यासाठी आता महापालिकेने कंबर कसली आहे. ‘इच वन टीच वन’ (प्रत्येक जण शिकवणार) या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. यासाठी समाजातील गुणवान व्यक्तींनी पुढे येऊन पालिका शाळांना मदत करावी, असे आवाहन ठाणे महापालिका शिक्षण विभागाने केले आहे.

ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्याबरोबरच त्यांना स्मार्ट बनवण्यासाठी महापालिका शिक्षण विभाग ई-लर्निंग, बालवाडी सुधार कार्यक्रम, डिजिटल शाळा, सेमी इंग्लिश स्मार्ट स्कूल यांसारखे अनेक उपक्रम राबवत आहे. आता ‘इच वन टीच वन’ हा नवीन उपक्रम प्रथमच पालिका शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. 

पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्वंकष शिक्षण देणे आवश्‍यक आहे. त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची कमतरता शिक्षण विभागास जाणवत आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रप्रणालीच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत आहे; परंतु त्यासोबतच त्यांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास होणेही आवश्‍यक आहे.विद्यार्थ्यांमधील कलागुण हेरून त्यांना त्याविषयी अनुभवी व्यक्तींकडून योग्य ते मार्गदर्शन लाभल्यास विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगळ्या वाटा मिळतील. शालेय जीवनातच त्यांचा योग्य व्यक्तिमत्व विकास होणे आवश्‍यक असल्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

सामाजिक कार्याची आवड असणाऱ्यांना आवाहन
स्वेच्छेने आणि निःशुल्क काम करणाऱ्यांनी पालिका शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण विभागाशी संपर्क साधून मुलांना योग्य ते मार्गदर्शन करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. पगार आणि मानधन जे घेत नाहीत, त्यांना शाळेत शिकवण्याचा अधिकार व संधी मिळत नाही. हे लक्षात घेत सामाजिक कामाची आवड असणाऱ्या व्यक्तींना संधी देण्यात आली असून, त्यांनी या संधीचा लाभ घेत मुलांच्या विकासात सहकार्य करावे. इच्छुकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन तेथे आपली माहिती नोंदवावी, असेही जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Municipal schools students in digital learning lessons