ओवा डोंगरातील तलावाकडे पालिकेचे दुर्लक्ष

सकाळ वृत्‍तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

गाळासह पाणी गळती रोखल्‍यास धारण क्षमतेत वाढ; वसाहतीतील पाणी समस्‍येवर उपाय 

खारघर : तळोजा ग्रामपंचायतीच्या वतीने ओवा डोंगरात निर्मिती केलेल्या तलावाकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. १९६० ते ६५ या काळात तळोजा गावातील विहिरीने तळ गाठले आणि गावात गंभीर पाणीप्रश्‍न निर्माण झाला. गावात बोअरवेल केल्या; मात्र खारट पाणी येत असल्याने पदरी निराशा आली. त्यात पाण्यासाठी महिलांची होणारी पायपीट पाहून ग्रामस्थांनी एकजूट करून वन विभागाशी संपर्क करीत ओवा डोंगराच्या कुशीत गावासाठी २२ मीटर खोल स्वतंत्र तलाव उभारून पाणी पुरवठा सुरू केला. 
सध्या या तलावात गाळ साचला असून तळोजातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे कोंढाणे धरणाच्या मागणीबरोबरच पालिकेने तळोजा धरणाचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

सिडकोने नवी मुंबई शहर निर्मितीचे काम हाती घेतल्यावर गावात एमआयडीसी आणि सिडकोच्या माध्यमातून पाणीपुरवठा झाल्याने या तलावाकडे दुर्लक्ष केले.गेल्या काही वर्षांत तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून गळतीही लागली आहे. पालिकेने तलावाचा विकास केल्यास खारघर अथवा परिसरात असलेल्या गावात किमान सहा-सात महिने पाणीपुरवठा होऊ शकतो. पालिकेची सूत्रे हाती घेताच तत्कालीन पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी तलावास भेट दिली होती. तलावातून होणारी पाणीगळती रोखल्यास आणि तलाव विकसित केल्यास चांगले पर्यटनस्थळ होऊ शकते, अशी संकल्पना मांडली होती.  

तळोजा तलावालगत असलेली जागा पालिकेने हस्तांतर करून धरणाचा विकास करावा, असे पत्र नगरसेवक हरेश केणी यांनी आयुक्तांना दिले आहे. आयुक्तांनी याकडे लक्ष घातले आहे. तलाव विकसित केल्यास परिसरातील गावात आठ ते दहा महिने पाणीपुरवठ्याबाबतची समस्या दूर होऊ शकते. 
- अजीज पटेल, नगरसेवक. 

पालिकेने हा तलाव विकसित करावा, यासाठी आयुक्तांची भेट घेणार आहे. 
- शत्रुघ्न काकडे, सभापती ‘अ’ प्रभाग समिती 

धरणाची पाहणी केली आहे. सध्या कोंढाणे धरण पालिका मालकीचे व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 - उल्हास वाड, पाणीपुरवठा अधिकारी, पालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipality overlooking Lake Ova