पनवेल पालिकेचा स्तुत्य निर्णय! अंत्यविधीचा खर्च पालिका करणार; स्थायी समितीची मंजुरी

समीर सुर्वे
Friday, 11 September 2020

कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी लागणारा खर्च पालिकेकडून करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी (ता. 9) मंजुरी देण्यात आली.

पनवेल : कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी लागणारा खर्च पालिकेकडून करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी (ता. 9) मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीकडून ठरावास मान्यता मिळाल्याने सदस्यांच्या सह्यांसाठी प्रस्ताव पाठवला आहे, असे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सदस्यांच्या सह्या होताच प्रस्तावावर प्रत्यक्षात कार्यवाही करण्यात येणार आहे.

येऊरमध्ये नोकरीसाठी डांबून ठेवलेल्या इंजिनिअर तरुणींची सुटका; भाजप कार्यकर्त्यांची कामगिरी

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांवर अंत्यविधी करण्यासाठी पालिकेमार्फत पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमी; तसेच पोदी येथील स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध केली आहे. या ठिकाणी असलेल्या विद्युत शवदाहिनीवर अंत्यविधीसाठी मृताच्या नातेवाइकांकडून अडीच हजार रुपये आकारले जाते. काही कारणास्तव या शवदाहिनीत बिघाड झाल्यास लाकडावरील अंत्यविधीसाठी 5 हजार रुपये आकारले जातात. या संदर्भात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवरील अंत्यविधीचा खर्च पालिकेमार्फत करण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपासून सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांकडून केली जात होती. 

कंगनाच्या बंगल्यावर आकसाने कारवाई नाही; मुंबई महापालिकेचे न्यायालयात स्पष्टीकरण

बुधवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या स्थायी समिती सभेत अंत्यविधीच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. या वेळी कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर गॅस दाहिनीवर अंत्यविधी करण्यास प्राथमिकता दिली जाणार असल्याचे; तसेच गॅसदाहिनी बंद असल्यास लाकडावर अंत्यविधी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चास मंजुरी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The municipality panvel approved a proposal to cover the cost of the funeral