दृश्‍यम चित्रपटाप्रमाणे रचलेला कट चपलेमुळे उलगडला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पंचनामा करताना मृतदेहाशेजारची त्याची चप्पल व्यवस्थित ठेवण्यात आल्याची बाब पोलिसांना खटकली. दारू अथवा नशेत खाली कोसळणाऱ्या व्यक्तीच्या चपला अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपासाचा निर्णय घेतला.

मुंबई : दृश्‍यम चित्रपटाप्रमाणे देखावा उभा करून हत्या अपघात असल्याचे दाखवल्याचा प्रकार वडाळा परिसरात घडला. पण चपलेमुळे हा सर्व प्रकार उघड करण्यात वडाळा पोलिसांना यश आले आहे.

वडाळा येथील विजेंद्र नख्ते हा 27 तरुणाचा मृतदेह 15 जूनला गणेश नगर येथील निर्जन स्थळी सापडला होता. स्थानिकांच्या मदतीने मृताची ओळख पटवण्यात आली. केईएम रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर विजेंद्रच्या भावाला मृतदेह सोपवण्यात आला. पण शरीरावर कोणतेही मारहाणीचे व्रण नसल्यामुळे कोणालाही संशय आला नाही.

शवविच्छेदनातही पहिल्यांचा दारुच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यानंतर पुढील तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनीही याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली. पण पंचनामा करताना मृतदेहाशेजारची त्याची चप्पल व्यवस्थित ठेवण्यात आल्याची बाब पोलिसांना खटकली. दारू अथवा नशेत खाली कोसळणाऱ्या व्यक्तीच्या चपला अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपासाचा निर्णय घेतला. त्यावेळी विजेंद्रचा भाऊ विश्‍वासने त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याचे सांगितले.

दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पण प्रेयसी काजल पाटील हिचे जबरदस्तीने लग्न साताऱ्यात करण्यात आले आहे. पण ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. पण काजलच्या चौकशीत तिने विजेंद्रशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर काजलचे कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आली. त्यावेळी काजलने सांगितल्यप्रमाणेच तिच्या कुटुंबियांनीही विजेंद्र वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी घरी आला होता. तो येथून खाऊन गेला. त्यानंतर त्याला पाहिले नसल्याचे सांगितले. काजलप्रमाणे घरातील व्यक्ती तोच प्रकार सांगत होते. पण पोलिसांनी काजलची सखोल चौकशी केली असता तिने सर्व प्रकार सांगितला. विजेंद्र सध्या पतीला सोडून त्याच्यासोबत लग्नासाठी काजलच्या मागे लागला होता. त्यामुळे त्याला मारण्याचा कट रचल्याचे तिने सांगितले.

तिने उंदीर मारण्याचे औषध त्याच्या जेवणात व दारूत टाकले. भरपूर दारू प्यायल्या नंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. मृत्यूनंतर काजलने त्याचा मृतदेह तेथे टाकल्याचा संशय आहे. दरम्यान याप्रकरणी अधिक तपास सुरू असून काजल पाटीलला अटक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder case solved by police at Mumbai