भावगीतपर्वाचा अस्त

Yashwant Dev
Yashwant Dev

मुंबई - "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', "असेन मी नसेन मी', "अखेरचे येतील माझ्या', "दिवस तुझे हे फुलायचे', "स्वर आले दुरूनी', "जीवनात ही घडी...' आदी शेकडो गीतांना संगीतसाज चढवून भावगीताचे विश्‍व समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांचे मंगळवारी पहाटे 1.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी दादर स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे शब्दप्रधान गायकीचा सच्चा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गीतकार, गायक, संगीतकार अशा तिन्ही भूमिकांतून मराठी संगीतविश्‍वावर अधिराज्य गाजवणारे देव काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चिकुनगुनिया आणि न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, गायिका उत्तरा केळकर, पद्मजा फेणाणी, अश्‍विनी भिडे-देशपांडे, राणी वर्मा, ज्येष्ठ नाट्यसंगीत कलाकार अरविंद पिळगावकर, गायक रवींद्र साठे, मिलिंद इंगळे, मंदार आपटे, ज्येष्ठ साहित्यिक रामदास भटकळ, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केसरी पाटील, डॉ. व्ही. एन. श्रीखंडे आदींनी देव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

देव यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 रोजी झाला होता. वडिलांकडून त्यांना संगीताचे सुरवातीचे धडे मिळाले. जी. एन. जोशी आणि गजानन वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळे देव सुगम संगीताकडे वळले. त्यांनी अनेक अभंग, भावगीते, लोकगीते, बालगीते, युगलगीतांना संगीत दिले. चित्रपटांबरोबरच अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिले होते.

देव यांनी "आकाशवाणी'वर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून कारकिर्दीला सुरवात केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला "भावसरगम' हा कार्यक्रम चांगलाच गाजला. दिवंगत गायक अरुण दाते यांना देव यांनी आकाशवाणीवरून घरोघरी पोचवले. आशा भोसलेंपासून ते आताच्या पिढीतील वैशाली सामंत, श्रीरंग भावे, मंदार आपटे आदींना त्यांनी संगीताचे धडे दिले. प्रत्येक गायकामध्ये शब्दप्रधान गायकी रुजवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com