मेघनाच्या मृत्यूचं गूढ उकललं, जिम ट्रेनरनेच दिलेलं...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 मार्च 2020

मेघनाच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करून ऑनलाईन औषध विक्रीविरोधात दंड थोपटलेल्या मनविसे अध्यक्ष संदीप पाचंगे याना अन्न व औषध प्रशासनाने या संशयास्पद मृत्यूबाबत उत्तर धाडले आहे. यात मृत तरुणीने जिममधील ट्रेनर योगेश निकम याच्या बॅगमधून घेतलेल्या डायनीट्रोफिनॉल या घातक रसायनांच्या औषधामुळे तिचा आकस्मिक मृत्यू ओढवल्याचे यात म्हटले आहे. 

ठाणे : महिनाभरापूर्वी ठाण्यातील शरीरसौष्ठवपटू मेघना देवगडकर (22) या तरुणीचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. तिच्या मृत्यूचे गूढ आता उकलले आहे. नौपाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून हा गुन्हा कल्याण पोलिस ठाण्यात वर्ग केला होता. मात्र, मेघनाच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करून ऑनलाईन औषध विक्रीविरोधात दंड थोपटलेल्या मनविसे अध्यक्ष संदीप पाचंगे याना अन्न व औषध प्रशासनाने या संशयास्पद मृत्यूबाबत उत्तर धाडले आहे. यात मृत तरुणीने जिममधील ट्रेनर योगेश निकम याच्या बॅगमधून घेतलेल्या डायनीट्रोफिनॉल या घातक रसायनांच्या औषधामुळे तिचा आकस्मिक मृत्यू ओढवल्याचे यात म्हटले आहे. 

कोरोनाशी लढण्यास 'असा' सज्ज झालाय महाराष्ट्र..

या पार्श्वभूमीवर पाचंगे यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन अशा प्रकारे अवैधपणे औषधविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याची मागणी नव्याने केली आहे. ठाणे पश्‍चिमेकडील खोपट, हंसनगर परिसरात राहणारी 22 वर्षीय मेघना शरीरसौष्ठव क्रीडाप्रकारातील राष्ट्रीय (ऑल इंडिया) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कल्याण येथील एका जिममध्ये नियमित सराव करीत होती. 3 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास जिममध्ये प्राशन केलेल्या औषधामुळे त्रास जाणवू लागला. यासाठी तिला ठाण्यातील खा,गी रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती खालावू लागल्याने तातडीने तिला मुंबईला सायन रुग्णालयात हलवण्यात आले असता 4 फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला. मेघनाच्या मृत्यूनंतर ऑनलाईन औषधविक्रीबाबत प्रश्न उपस्थित करीत मनविसेचे संदीप पाचंगे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता.

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार- हसन मुश्रीफ

त्यावर, अन्न व औषध प्रशासनाच्या परिमंडळ - 1 च्या सहा. आयुक्त माधुरी पवार यांनी पाचंगे यांना पाठवलेल्या उत्तरात धक्कादायक खुलासा केला आहे. परवानाधारक औषधविक्रेत्यांकडून ऑनलाईन औषध विक्री होत असल्याची बाब अद्यापपर्यंत उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. तसेच, मेघना देवगडकर हिने प्राशन केलेले औषध आयुर्वेदिक नसून तिने जिममधील ट्रेनर योगेश निकम यांच्या बॅगमधून घेऊन सेवन केल्याने तिचा आकस्मिक मृत्यू ओढवला असल्याचे प्राथमिक तपास व चौकशी अहवालावरून दिसून आल्याचे म्हटले आहे. मेघनाच्या मृत्यूचे कारण असणाऱ्या औषधातील घटक अत्यंत हानिकारक असून या औषधाच्या उत्पादन व विक्रीस केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे, या मृत्यूप्रकरणाचा सखोल तपास करण्यासह अशा प्रकारे अवैध औषधविक्री केल्यास कोरोनासारख्या विषाणूंचा फैलाव होऊ शकतो, अशी भीतीही पाचंगे यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mystery of Meghan's death was solved