मॉडेलिंगच्‍या आमिषाने विवस्‍त्र चित्रीकरण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

धोका टाळण्‍यासाठी...
  सोशल मीडियावर छायाचित्र अपलोड करू नका.
 वैयक्तिक माहिती सांगू नका.
 शेअर करायची सवय असते. शक्‍यतो ते टाळा.
 प्रियजनांशी चॅटिंग, व्हिडीओ कॉल करताना सर्वच खासगी बाबी शेअर करू नका.
 डेटिंग ॲप्स वापर टाळाच.
 थर्ड पार्टी ॲप्स अटी-शर्ती वाचूनच इन्स्टॉल करा.

मुंबई - कुर्ला येथील २६ वर्षीय तरुणाचे विवस्त्र चित्रीकरण समाज माध्यमांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन बिटकॉईनमध्ये खंडणी मागण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या मॉडेलला आयएमओ ॲपवरून कॉल आला. कॉल करणाऱ्याने मॉडेलिंगबाबत चर्चा करत कपडे काढून बॉडी दाखवण्यास सांगितले. मॉडेल होण्याची संधी मिळेल या आशेने तरुण विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ देण्यास तयार झाला; मात्र पैसे न दिल्यामुळे आरोपीने ती चित्रफीत व्हायरल केली आहे.

कुर्ला परिसरात राहणारा २६ वर्षीय सलमान (नावात बदल) मॉडेलिंग समन्वयक म्हणून काम करतो. परदेशातील एका नामांकित मॉडेलिंगच्या कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून ठगाने इन्स्टाग्रामवर सलमानशी ओळख करून घेतली व नंतर संपर्क वाढवला. त्याच ओळखीतून परदेशात मॉडेलिंगची संधी देण्याचे स्वप्न दाखवले. नंतर १७ जुलैला त्याच्या मोबाईलवर आयएमओ ॲपवरून त्याला कॉल आला. समोरच्या व्यक्तीने मॉडेलिंग करता का, याबाबत विचारणा केली. सलमानने होकार देताच शर्ट काढून शरीर दाखवण्यास सांगितले. सलमानने तसे केल्यानंतर आरोपीने त्याला पॅंटही काढण्यास सांगितली. मॉडेलिंग काँट्रॅक्‍ट मिळेल या आशेने त्याने तेही केले. तो पूर्णपणे नग्न झाल्यानंतर आरोपीने त्याचे नकळत चित्रीकरण केले व त्याचा दूरध्वनी क्रमांक घेतला. पुन्हा दूरध्वनी करण्याचे आश्‍वासन दिले. ठरल्यानुसार त्याने पुन्हा कॉल केला. 

त्या वेळी आरोपीने सलमानला त्याच्या नावाचे बनावट इन्स्टाग्रामवर खाते उघडले असून त्यात विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी बिटकॉइनद्वारे  डॉलर्समध्ये खंडणीची मागणी केली. सलमानने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने त्याची चित्रफीत  व्हायरल केली.

कुटुंबाकडून आधार
घाबरलेल्या सलमानने हा प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी त्याला धीर दिल्यानंतर त्याने कुर्ला पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. प्राथमिक तपासात आरोपीने सलमानच्या नावाने बनावट ईमेलचा वापर केला आहे. या प्रकरणात परदेशी सायबर गुन्हे करणाऱ्या सराईताचा सहभाग असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. आरोपीने त्याच्या काही नातेवाईकांनादेखील ही वादग्रस्त चित्रफीत पाठवली होती.

धोका टाळण्‍यासाठी...
  सोशल मीडियावर छायाचित्र अपलोड करू नका.
 वैयक्तिक माहिती सांगू नका.
 शेअर करायची सवय असते. शक्‍यतो ते टाळा.
 प्रियजनांशी चॅटिंग, व्हिडीओ कॉल करताना सर्वच खासगी बाबी शेअर करू नका.
 डेटिंग ॲप्स वापर टाळाच.
 थर्ड पार्टी ॲप्स अटी-शर्ती वाचूनच इन्स्टॉल करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naked shoot for modeling bait