मोठी बातमीः नालासोपाऱ्यात 4 मजली इमारत कोसळली

विजय गायकवाड
Wednesday, 2 September 2020

नालासोपाऱ्यात मध्यरात्री 1 वाजता 4 मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. दुर्घटना घडण्याअगोदरच इमारतीच्या भिंतीची माती कोसळत असल्यानं तेथील 5 कुटुंब इमारतीतून बाहेर आली होती.

मुंबईः  नालासोपाऱ्यात मध्यरात्री 1 वाजता 4 मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. दुर्घटना घडण्याअगोदरच इमारतीच्या भिंतीची माती कोसळत असल्यानं तेथील 5 कुटुंब इमारतीतून बाहेर आली होती. त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण रहिवाशांचे पूर्ण संसार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली उद्धवस्थ झालेत. वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, तुलिंज पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. 

नालासोपारा पूर्व मजेठिया पार्क परिसरात 4 मजल्याच्या  साफल्य बिल्डिंग ही  इमारत होती. 2009 साली ही इमारत बांधली होती. या इमारतीमध्ये एकूण 20 प्लॅट होते. इमारत धोकादायक झाल्यानं रहिवाशांना महापालिकेनं बाहेर पडण्याची नोटीस दिली होती. त्यामुळे 15 कुटुंब अगोदरच दुसरीकडे राहण्यासाठी गेली होती. तर 5 कुटुंब आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे  याच इमारतीत आपला जीव मुठीत घेऊन राहत होती. रात्री 10 वाजल्यापासूनच इमारतीच्या भिंतीची माती कोसळत होती. त्यामुळे रहिवाशी घाबरलेल्या अवस्थेत होते. रात्री 12 च्या सुमारास काहीसा आवाज झाल्याने सर्व रहिवाशी इमारतीच्या खाली आले आणि मध्यरात्री 1 वाजता सर्वांच्या डोळ्यासमोर अक्षरशा पत्यासारखी 4 मजली इमारत कोसळली. 

अधिक वाचाः  जेईई'-'नीट'च्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वेही सरसावली; अतिरिक्त ट्रेन सोडणार

घटनेची माहिती मिळताच बहुजन विकास आघाडीचे नेते रुपेश जाधव तात्काळ घटनास्थळी पोहचून त्यांनी घटनेची पाहणी केली आणि नागरिकांना धीर दिला आहे. त्यानंतर वसई विरार महापालिकेची अग्निशमन दलाच्या गाड्या, तुलिंज पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.

रहिवाशांनी  सतर्कता बाळगून बाहेर आल्यानं सुदैव त्यांचे बलवत्तर होते, हीच दुर्घटना झोपेत झाली असती तर मोठी जीवित हानी झाली असती. 

अधिक वाचाः महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या, किरीट सोमय्यांना म्हणाल्या...

 इमारतीच्या पहिल्या ते चौथ्या मजल्यावर 5 कुटुंब राहत होते. चौथ्या मजल्यावर 401 रूम मध्ये देवरुखकर कुटुंब राहत होते. त्यांच्या घरात 4 माणसं आहेत. दुर्घटनेच्या 10 मिनिट अगोदर सीमा देवरुखकर आणि त्यांचे पती दयानंद हे दोघे आपल्या चौथ्या मजल्यावरील रुममध्ये जाऊन पैसे घेऊन आले आणि त्यांनी इमारतीच्या गेटच्या बाहेर पाय ठेवताच इमारत पत्त्यासारखी त्यांच्या डोळ्यासमोर कोसळल्याची माहिती सीमा देवरुखकर यांनी दिली.

इमारतीला तडे गेल्याने आणि भिंतीची माती पडत असल्यानं आम्ही पाचही कुटुंब इमारतीच्या बाहेर आलो होतो. इमारतीच्या बाहेर आम्ही सर्वजण उद्या महापालिकेत भेटायलाही जाणार होतो. पण मध्यरात्रीचं आमची इमारत कोसळली. आम्ही फक्त एका कपड्यावर घराबाहेर निघालो आहोत. आमचे संसार पूर्णपणे उद्धवस्थ झालेत. आमच्याजवळ आता काहीच नाही, असे कोसळलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे राजेश तिवारी यांनी सांगितले आहे. 

इमारत दुर्घटनेत सतर्कतेमुळे वाचलेली कुटुंब 

तळमजलावर किराणा दुकान होते त्यात एक कुटुंब राहत होते त्यांची नाव बहाद्दूर गुप्ता, त्यांची पत्नी लक्ष्मीबहाद्दूर, मुलगी रेणुका, मुलगा इश्यू 

पहिला मजला 
नितीन परमार, त्यांची पत्नी प्रीती परमार, सागर गुरव, त्यांची पत्नी वैशाली गुरव, अनिल पाटील , त्यांची पत्नी  शाशीप्रभा पाटील, मुलगा सौरभ पाटील, भाचा साहिल चव्हाण, आई कालाताई पाटील

दुसरा मजला 

राजेश तिवारी, त्यांची पत्नी राजकुमारी तिवारी, मुलगी सूची तिवारी, काजल तिवारी, मुलगा करण तिवारी 

चौथा मजला 

दयानंद देवरुखकर, पत्नी सीमा देवरुखकर,मुलगी वैभवी, मुलगा सिद्धेश

(संपादनः पूजा विचारे)

Nalasopara four storey redeveloped residential building collapsed No casualty 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nalasopara four storey redeveloped residential building collapsed No casualty