राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाचा घोळ सुरूच; 'ही' नावे चर्चेत

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाचा घोळ सुरूच; 'ही' नावे चर्चेत

मुंबई : सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकून तीन दिवस उलटले, तरी राष्ट्रवादीला मुंबईच्या नव्या अध्यक्षांच्या नेमणुकीबाबत अद्याप निर्णय घेता आलेला नाही. राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह आमदार किरण पावसकर, विद्या चव्हाण, माजीद मेमन यांच्या नावाची चर्चा आहे. यापैकी कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करायचे, यावर राष्ट्रवादीत घोळ असल्याचे कळते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला पूर्णत: अंधारात ठेवून सचिन अहिर यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. सोडचिठृी देतेवेळी अहिर हे मुंबईचे अध्यक्ष होते. राजीनामा देण्याचे सौजन्य न दाखवता अहिर यांनी थेट शिवसेनेचा भगवा हातात घेतला. त्यांच्या पक्षत्यागाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून, या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना फोडण्यासाठी भाजप सरकार ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप केला आहे.

पक्षाने मुंबईच्या अध्यक्षपदाबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र, मुंबईच्या नेतृत्वाबाबत पक्षात एकमत होताना दिसत नाही. मुंबईच्या अध्यक्षपदासाठी नवाब मलिक यांचे नाव आघाडीवर आहे. मलिक हे मुंबईतील कुर्ला, अणुशक्तीनगर परिसरात मासबेस असलेले नेते आहेत. मलिक यांच्याशिवाय कामगार संघटनेत कार्यरत असलेले किरण पावसकर, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या विद्या चव्हाण, तसेच राज्यसभा सदस्य माजीद मेमन यांची नावे संभाव्य अध्यक्ष म्हणून घेतली जात आहेत. 

दरम्यान, महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचा निर्णय एका दिवसात होतो, मग मुंबईच्या अध्यक्षपदाबाबत विलंब का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. यासंदर्भात नवाब मलिक यांच्याशी संपर्क साधला असता, मुंबईच्या नव्या अध्यक्षपदाबाबत अजून निर्णय झालेला नाही. येत्या एक-दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com