PM Modi Mumbai Visit : शिवसेनेतील फुटीने भाजपचा मार्ग सुकर? मुंबई जिंकण्यासाठी थेट 'मोदी' मैदानात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi Mumbai Visit

PM Modi Mumbai Visit : शिवसेनेतील फुटीने भाजपचा मार्ग सुकर? मुंबई जिंकण्यासाठी थेट 'मोदी' मैदानात

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात ३८,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. राजकीय दृष्टीकोणातून मोदींचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. (PM Modi Mumbai Visit)

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून नरेंद्र मोदी पहिल्यांदा मुंबईत दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला हा मोठा शह असू शकतो. दरम्यान मोदींचा दौरा विकासासाठी आहे की राजकारणासाठी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

नरेंद्र मोदी आणि निवडणूक प्रचार, असे समिकरण भाजपमध्ये तयार झाले आहे. देशात कुठेही प्रमुख निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांचा प्रमुख चेहरा असतो. पुणे महापालिका असो की मुंबई महापालिका भाजपने मोदींचा चेहरा समोर केला आहे. यापूर्वी देखील पुणे मेट्रोच्या अपूर्ण कामाचे नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते. मात्र निवडणुका लागल्या नाहीत त्यामुळे भाजपच्या मेहनतीवर पाणी फेरले.

सध्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापासून भाजपचे स्थानिक नेते मुंबई महापालिका काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 

गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे भाजप मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. देशाला सर्वात जास्त कर देणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे. या महापालिकेचा सर्वात मोठा बजेट आहे. ही महापालिका जिंकण्यासाठी नरेंद्र मोदींचा आजचा मुंबई दौरा असल्याची टीका विरोधक करत आहेत.

मुंबईत ज्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आदी कामे पंतप्रधान करणार आहेत. त्यातील बहुतांश विकास प्रकल्प शिवसेनेने महापालिकेत सत्तेत असताना केले आहेत. शिवसेनेने केलेल्या कामांचे उद्घाटन करण्यासाठीच पंतप्रधान मुंबईत येत असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने असे आरोप देखील केले आहेत. यामुळे श्रेयवादाची लढाई देखील रंगली आहे.

मुंबईतील मतदारांना विश्वासात घेण्यासाठी भाजपच्या हा डावपेचाचा भाग आहे. तसेच, पंतप्रधान मोदींच्या या भेटीतून पक्षाला हे सांगायचे आहे की मुंबई (आर्थिक राजधानी) देशाच्या विकासासाठी कशी अविभाज्य आहे. 

मुंबई आणि शिवसेना यांचे अनोखे नाते आहे. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राजकीय अस्तित्व नष्ट करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजप मुंबई जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. पक्षात फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला  सहानुभूती मिळत आहे. याचा सामना करणे ही भाजपची सर्वात मोठी चिंता आहे. 

हेही वाचा: Balasaheb Thackrey : बाळसाहेबचं ते! नरेंद्र मोदींचा बाळसाहेब ठाकरेंना वाकून नमस्कार

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले, परंतु आगामी बीएमसी निवडणुकीत मुंबईकर त्यांना मतदान करतील याची भाजपला खात्री नाही. त्यामुळे भाजप नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर करुन आज मुंबई महापालिका निवडणुकीचे प्रचाराचे नारळ फोडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नरेंद्र मोदींचा हा राजकीय दौरा नसल्याचे भाजप नेते सांगत आहेत. मात्र आज मोदींच्या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही राजकीय वक्तव्य झाले तर मोदींचा मुंबई दौरा राजकारणासाठी असल्याचे स्पष्ट होईल. 

हेही वाचा: Parth Pawar: अजित पवारांचे चिरंजीव शंभुराज देसाईंच्या भेटीला; चर्चेला उधाण