आता, मोदी विरोधात "लोकशाही मित्र' मैदानात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मुंबई - विविध क्षेत्रांतील सम-विचारी लोकांनी मिळून भारतीय जनतेस आवाहन करणारे एक पत्रक प्रसिद्ध केल्यानंतर आता मोदी सरकारच्या विरोधात अराजकीय व्यासपीठाची घोषणा करण्यात आली आहे. "लोकशाही मित्र' ( Friends of Democracy ) या नावाखाली केंद्र सरकारच्या विरोधात राज्यभरात प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध संस्था, व्यक्‍ती एकवटल्या आहेत. आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. या "लोकशाही मित्र'च्या फोरमचे प्रवक्‍ते म्हणून डॉ. विवेक कोरडे व ऍड. राज कुलकर्णी काम पाहणार आहेत, तर निमंत्रक म्हणून विजय दिवाण, आशुतोष शिर्के व भारती शर्मा यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकशाहीविरोधी असणारे, भारताच्या सर्वसमावेशक एकात्मतेस व अखंडतेस हानिकारक असणारे सरकार आता पायउतार करायला हवे, या मताशी सहमत असणाऱ्या नागरिकांच्या ऐक्‍याचे हा फोरम काम करेल. हा फोरम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. तरीही त्याचे प्रमुख उद्दिष्ट मात्र राजकीय आहे. म्हणजेच आज केंद्रात सत्तेत असणाऱ्या मनुवादी व लोकशाहीविरोधी भाजप व त्याच्या मित्र पक्षास 2019 मधील निवडणुकीमध्ये सत्तेतून पायउतार करणे, हेच या फोरमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी महाराष्ट्रातील इतर समविचारी संस्था, संघटना, समूह यांच्याशी सहकार्य करून या कार्याची व्याप्ती राज्यभर पसरवण्यात येणार असल्याचे फोरमच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: narendra modi oppose democracy friend politics