वाहतूकदार जाणार 20 जुलैपासून देशव्यापी संपावर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

डिझेलचे वाढते भाव, टोल शुल्क आणि थर्ड पार्टी इन्श्‍युरन्स प्रीमियममध्ये झालेल्या वाढीविरुद्ध देशभरात संप पुकारला होता. मात्र, त्यानंतर चर्चेच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे 20 जुलैला होणाऱ्या संपात आम्ही सहभागी होण्याचा विचार करीत आहोत. 

- मोहिंदरसिंग घुरा, राज्य सचिव, ट्रक चालक-मालक संघटना. 

मुंबई : इंधन दरावाढीमुळे हैराण झालेल्या मालवाहतूकदारांनी अनिश्‍चित काळासाठी संप पुकारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 20 जुलैपासून संपाची घोषणा ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस (एआयएमटीसी) यांनी केली.

यापूर्वी ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ गुड्‌स व्हेईकल ओनर्स असोसिएशन डिझेलचे वाढते भाव, टोल शुल्क आणि थर्ड पार्टी इन्श्‍युरन्स प्रीमियममध्ये झालेल्या वाढीविरुद्ध 18 जूनला अनिश्‍चित काळासाठी संप पुकारला होता. 

सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिल्यानंतर चार दिवसांनी हा संप मागे घेण्यात आला होता. मात्र, पुन्हा माल वाहतूकदारांनी संपाचा इशारा दिल्याने औद्योगिक, भुसार माल वाहतूक, आयात-निर्यातीवर संपाचा परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. देशभरात एकच परमीट असावे, अशी मागणी करीत खासगी प्रवासी वाहतूक संघटनाही या संपात सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: The nationwide closure of the transporters on July 20