#NavDurga सोशिक सीता नाही; झाशीच्या राणी व्हा! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो. स्त्रीला अबला ठरवून मग तिच्या सबलीकरणाचे प्रदर्शन केले जाते. खरे तर आज गरज आहे, स्त्री आणि पुरुषांच्या वैचारिकतेच्या व मानसिकतेच्या सबलीकरणाची. 

पुरुषप्रधान संस्कृतीत एकीकडे स्त्रीला आपण दुर्गा, चंडिका अन्‌ अंबा अशी रूपे देतो... तिला आदर-सन्मान देतो; तर दुसरीकडे तिच्यावर अत्याचारही करतो. स्त्रीला अबला ठरवून मग तिच्या सबलीकरणाचे प्रदर्शन केले जाते. खरे तर आज गरज आहे, स्त्री आणि पुरुषांच्या वैचारिकतेच्या व मानसिकतेच्या सबलीकरणाची. 

मी गेली दोन शतके औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे. माझे वडील नेहमी म्हणत, की तू बॅंकेत, एलआयसी किंवा शिक्षिकेची नोकरी कर... तुला सोपे जाईल. परंतु, नवनवीन आव्हाने स्वीकारणे हा जणू माझा छंदच. सर्वसामान्य आयुष्य जगण्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रांत जावे, असे मला नेहमी वाटे. पदवीधर होत असतानाच नोकरीला लागले. तेव्हा ऍडमिनिस्ट्रेशनचा रोल मिळाला. नव्यानेच येऊ घातलेल्या प्रोजेक्‍टमध्ये येईल ते काम करावे लागे. त्यातून खूप काही शिकायला मिळाले. नोकरी करतानाच पदव्युत्तर आणि व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले. मनुष्यबळ व्यवस्थापन विकास, कामगार चळवळ घडामोडी, कामगार संबंध, औद्योगिक संबंध, युनियनबरोबर चर्चा, करार इत्यादी क्षेत्रात आजही पुरुषांची मक्तेदारी आहे. पण, याचा अर्थ असा नाही, की आपण महिला हे कार्यक्षेत्र हाताळू शकत नाही. उलट महिला हे व्यवस्थापन अतिशय नेटकेपणाने हाताळू शकते. मला माझ्या आजवरच्या कार्यकाळात अनेक अडचणी आल्या... रोज नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागे. सगळ्यांना सामोरे जाताना खूप काही शिकायला मिळाले. विविध प्रकारच्या व्यक्‍ती, स्वभाव, कौशल्य, अंतर्गत आणि बाह्यराजकारण असे खूप काही... आज या पदावर पोहोचताना अनेक वेळा थोरामोठ्यांचे लाभलेले मार्गदर्शन, अनुभव खूप कामी आले. 

प्रत्येक माहिला ही उपजतच एक व्यवस्थापिका असते. तिच्यात विविध कला, कल्पकता आणि गुण असतात. आपल्याला काय आवडते, काय करायला जमते, त्यातून उत्तम व्यक्तिमत्त्व घडवणे प्रत्येक स्त्रीच्या हातात आहे. आपली आवड-निवड जपत आपल्यातील सुप्त गुणांचा, कौशल्याचा विकास करीत स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. सोशिक सीता होऊन रामाच्या मदतीची वाट पाहण्यापेक्षा झाशीच्या राणीचा कणखरपणा असणे आवश्‍यक आहे.

जयंती काटकर 
असिस्टंट व्हाईस प्रेसिडंट (एच आर), दीपक फर्टिलायझर ऍण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि. तळोजा, नवी मुंबई 

Web Title: NavDurga Jayanti Katkar Empowerment of women and men's ideology and mentality