नवी मुंबईत थर्टीफस्टची रात्र शांततेत, तळीरामांच्या संख्येत कमालीची घट

विक्रम गायकवाड
Friday, 1 January 2021

नवी मुंबई पोलिसांनी देखील थर्टीफस्टच्या मध्यरात्री चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सर्वत्र नाईट कर्फ्यू लागू केला आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी देखील थर्टीफस्टच्या मध्यरात्री चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे यावर्षी मद्य प्राशन करुन वाहन चालविणारे फक्त 27 तळीराम पोलिसांच्या हाती लागले आहेत. असे असले तरी नवी मुंबई पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 422 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. 

मागील वर्षी नवी मुंबई पोलिसांनी दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या तब्बल 385 तळीरामांवर ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह मोहिमेदरम्यान कारवाई केली होती. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 1 हजार 697 वाहन चालकांवर कारवाई केली होती. ब्रिटनची राजधानी लंडनसह पूर्व इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या व्हायरसचा संसर्ग वेगाने फैलावत असून कोरोनाचा हा नवीन प्रकार ब्रिटनपुरता मर्यादित न राहता इटली, नेदरलँड, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत फैलावला आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोना व्हायरस हा आगोदर आढळलेल्या कोरोना व्हायरसपेक्षा 70 टक्के अधिक घातक आणि वेगाने फैलावत असल्याने महाराष्ट्र सरकारनं गेल्या 21 डिसेंबरला अद्यादेश काढून 5 जानेवारी पर्यंत (नाईट कर्फ्यु)रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी देखील आपल्या हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नागरिकांना घोळक्याने अथवा गर्दी करुन फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विशेष म्हणजे नववर्ष स्वागतानिमित्त गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये किंवा सोसायटीच्या टेरेसवर देखील रात्री  11नंतर मनोरंजनाचे कार्यक्रम अथवा अन्य कार्यक्रम आयोजित करण्यास पोलिसांकडून बंदी घालण्यात घालण्यात आली होती. 

रात्रीच्या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवला आहे. यावर्षी सगळीकडेच कोरोनाचे सावट असल्याने थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला होता. तसेच महामार्गावरील टोल नाके, शहरातील महत्वाचे चौक,सिग्नल,जंक्शन अशा विविध ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली होती.

हेही वाचा- वाशीतल्या मनपा रुग्णालायत येणाऱ्या रुग्णांची अँटीजन टेस्ट, नियोजन नसल्याने रुग्ण त्रस्त

या नाकाबंदी दरम्यान वाहतूक पोलिसांनी मद्य पिऊन वाहन चालविणारे वाहन चालक आणि भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांची शुक्रवारी पहाटे पर्यत तपासणी केली. या तपासणीत यावर्षी फक्त 27 तळीराम सापडले. या कारवाई बरोबरच वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकीवरुन फिरणारे-270, सिट बेल्ट न लावता फिरणारे - 101, तसेच दुचाकीवरुन ट्रिपल सिट फिरणारे-24 आदी वाहन कायदयाचे उल्लंघन करणाऱ्या एकूण -422 कसुरदार वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. 

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Navi Mumbai 31st night peace no untoward incident took place


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai 31st night peace no untoward incident took place