नवी मुंबईत उभारणार "बीकेसी-2' 

ऊर्मिला देठे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) वाणिज्य केंद्र विकसित केल्यानंतर आता त्याच धर्तीवर नवी मुंबईत बीकेसी-2 वाणिज्य संकुल उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सिडको प्राधिकरणाने "स्मार्ट बीकेसी' हा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. संचालक मंडळाने त्याला मान्यता दिली आहे. काही दिवसांत त्याचे प्रारूप मुख्यमंत्र्यांसमोर सादर केले जाईल. 

खारघर आणि तळोजा औद्योगिक वसाहत परिसरात सिडकोद्वारे बीकेसी-2 म्हणजेच "स्मार्ट बीकेसी' हे वाणिज्य संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्‍यक सुविधा निर्माण करण्याबाबत रिलायन्स इन्फ्रा आणि एल ऍण्ड टी कंपनीने उत्सुकता दर्शवली आहे. सिडको नोडमधील विशेषत: खारघर क्षेत्र, नैना आणि एसईझेड ही क्षेत्रे विकसनशील असून, सिडको आणि नवी मुंबई एसईझेड कंपनीला या भागांचा विकास करायचा आहे. सिडकोने या भागात मेट्रोचे काम सुरू केले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो असा अंदाजे 13 हजार कोटींचा प्रकल्प तयार होत आहे. त्यामुळे या ठिकाणी बीकेसीसारखे वाणिज्य संकुल व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल. येथील गृहप्रकल्पाचे भूखंड वगळून काही भूखंडांची विक्री झालेली नाही. येत्या काही दिवसांत वाणिज्य संकुलाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. 

नवी मुंबईत उद्योगधंद्यांना पोषक वातावरण असूनही अद्याप उद्योगांना बस्तान बसवता आलेले नाही. त्यामुळे नोकरी-धंद्यासाठी नवी मुंबईतून मोठ्या संख्येने नागरिक मुंबईत येतात. त्याचा ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही पडतो. हा ताण आणि प्रवासासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी बीकेसी-2 मध्ये वाढीव एफएसआय देण्याचे निश्‍चित झाले आहे. 

"स्मार्ट बीकेसी'चे स्वरूप 
खारघर नोड परिसरातील 125 हेक्‍टरमध्ये वाणिज्य संकुल उभारले जाईल. तळोजा औद्योगिक वसाहतीपर्यंत त्याचा विस्तार असेल. 
80 हेक्‍टरवर सेंट्रल पार्क आणि गोल्फ पार्क असेल.0 50 टक्के भूखंडावर उत्तुंग इमारती असतील. बहुतांश इमारती पिरॅमिडच्या आकारात बांधण्यात येतील. 
विकसित होणाऱ्या जागेसाठी एक ते दोन एफएसआय देण्याचे निश्‍चित झाले असले तरी "कोअर एरिया' असलेल्या जमिनीवर सिडको तीन एफएसआय देईल. 
परदेशातील "नाईट लाईफ'च्या धर्तीवर येथील दुकाने आणि व्यावसायिक गाळे बांधले जातील.

Web Title: Navi Mumbai BKC build -2