
महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या सरकारी आयुक्त निवासाला आज सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.
नवी मुंबई : महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या सरकारी आयुक्त निवासाला आज सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने ही आग निवासाच्या प्रवेशद्वारावरील लाकडी चौकटींना लागल्यामुळे आतपर्यंत पसरली नाही. यादरम्यान महापालिकेच्या नेरूळ येथील अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठे अनर्थ टळले.
हेही वाचा - BMC कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! महापौरांनी जाहीर केला दिवाळी बोनस
महापालिकेतर्फे नेरूळ रेल्वे स्थानकासमोर उभारण्यात आलेल्या आयुक्तनिवासाला सकाळच्या सुमारास आग लागली. बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या विद्युत विहिन्यांमध्ये शॉकसर्किट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शॉक सर्किटमुळे ठिणग्या प्रवेशद्वारावरील विजेच्या वाहिन्या आणि लाकडी चौकटीवर पडल्यामुळे आग लागली. या आगीची माहिती कळताच नेरूळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली. दरम्यान आगीमुळे परिसरात धुराचे लोण उठले होते. बंगल्यातून धुराचे लोण येत असल्याने रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. काही दिवसांपूर्वीच दसऱ्याच्या महुर्तावर अभिजीत बांगर यांनी सहकुटुंब गृहप्रवेश केला आहे. आग लागली तेव्हा त्यांचे कुटुंब निवासस्थानात होते. परंतू कोणालाही इजा झाली नसल्याचे समजते.
हेही वाचा - पैशांसाठी चक्क प्रियकरालाच पळविले, प्रेयसीसह सात जणांना अटक
चर्चांना उधाण
महापालिका आयुक्तांचे निवासस्थान गेले तीन महिने तत्कालिन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ताब्यात ठेवल्यामुळे निवासस्थानावरून प्रश्न उपस्थित होत होते. अलिकडेच या निवासस्थानाचा ताबा आयुक्त अभिजीत बांगर यांना मिळाला खरा, परंतू बंगल्यातील महत्वाचे सामान गायब असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. या प्रकरणी पालिकेतील अधिकाऱ्यांसहीत सर्वांनीच तोंडावर हात धरून मौन बाळगले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता आग लागल्याने पुन्हा एकदा आयुक्तनिवासाची चर्चांना उधाण आले आहे.
-----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )