
नवी मुंबई महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्राकडून कुटुंबातील एकाच व्यक्तीची कोरोना टेस्ट करुन कुटुंबातील इतर व्यक्तींची टेस्ट न करता त्यांची कोरोना टेस्ट केल्याचे दाखवून मोठया प्रमाणावर आर्थिक भ्रष्ट्राचार करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला.
मुंबईः नवी मुंबई महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्राकडून कुटुंबातील एकाच व्यक्तीची कोरोना टेस्ट करुन कुटुंबातील इतर व्यक्तींची टेस्ट न करता त्यांची कोरोना टेस्ट केल्याचे दाखवून मोठया प्रमाणावर आर्थिक भ्रष्ट्राचार करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांची डाटा एन्ट्री करण्यासाठी नेमलेले नोडल ऑफिसर सचिन नेमाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रावर कोरोना चाचणीसाठी गेलेल्या व्यक्तीच्या कुटूंबातील अन्य व्यक्ती कोरोना चाचणी केंद्रावर गेल्या नसताना तसेच त्यांनी कुठल्याही प्रकारची चाचणी केली नसताना त्यांची कोरोना चाचणी झाल्याचे आणि त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे महापालिकेकडून दाखविण्यात येऊन सदरचे सर्व रिपोर्ट केंद्र शासनाच्या आय.सी.एम.आर. या साईटवर दर्शविण्यात आलेत.
अधिक वाचा- नवी मुंबईत किळसवाणा प्रकार, पाणीपुरीसाठी शौचालयातल्या अस्वच्छ पाण्याचा वापर
ही घटना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून देताना काही वर्षांपूर्वी मृत झालेल्या लोकांची देखील कोरोना चाचणी निगेटिव्ह दाखवण्यात आल्याची बाब समोर आणली आहे. बोगस चाचण्या करुन कोरोना टेस्टसाठी वापरले जाणारे किट न वापरता, त्या किटची रक्कम हडप करुन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार केला जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
अधिक वाचा- 2 वर्षांपूर्वी धोकादायक घोषित केलेला 'आरे'मधला ब्रिजचा भाग कोसळला
याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कुडुस्कर यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीत एक सहाय्यक आयुक्त आणि लेखा अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीला महापालिकेने नागरिकांच्या आतापर्यंत केलेल्या सुमारे साडेतीन लाख ऍन्टिजेन चाचण्यांच्या डाटा एन्ट्रीची तपासणी करण्यास सांगितले असून लवकरात लवकर याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
---------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Navi mumbai Corona test scam case A three member committee appointed to investigate