Maharashtra Bhushan पुरस्कार सोहळ्यानिमित्त नवी मुंबईत अवजड वाहनांना सलग दोन दिवस बंदी

महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी वाहतुकीत बदल केल्याची अधिसूचना वाहतूक विभागाने जारी केली.
Maharashtra Bhushan पुरस्कार सोहळ्यानिमित्त नवी मुंबईत अवजड वाहनांना सलग दोन दिवस बंदी
Summary

महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी वाहतुकीत बदल केल्याची अधिसूचना वाहतूक विभागाने जारी केली.

नवी मुंबई - खारघरमधील मैदानात रविवारी (ता. १६) होणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी नवी मुंबई वाहतुक विभागाने उद्या (ता. १५) दुपारी २ ते १६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात येण्यास व जाण्यास बंदी घातली आहे. तसेच खारघर शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आला.

नवी मुंबई आयुक्तालय परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल केल्याची अधिसूचना वाहतूक विभागाने जारी केली. ऐरोली टोलनाका, विटावाकडून ठाणे-बेलापूर रस्ता, शिळफाट्याकडून महापे व तळोज्याकडून जुना मुंबई-पुणे महामार्गाने नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत अवजड वाहनांना बंदी घातली आहे.

या मार्गात बदल

१५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते १६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत खारघरमधील ग्रामविकास भवन ते ओवेगाव चौक ते सिडको फुटबॉल मैदान चौक ते मेट्रो ब्रिज खालून बी. डी. सोमणी स्कूल चौक ते जयकुमार सर्कल ते गुरुद्वारा चौकापर्यंतचा रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. हा रस्ता फक्त कार्यक्रम स्थळावरील पार्किंगमधून श्री सदस्यांना घेऊन येणारी वाहने-बस यांसाठी खुला राहणार आहे.

हा पर्यायी मार्ग

या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना ग्रामविकास भवन ते ग्रीन हेरिटेज चौक ते मूर्ती चौक, विनायक सेठ चौकमार्गे पापडीचा पाडा, तळोजा मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे. त्याचप्रमाणे आरएएफ तळोजाकडून पापडीचा पाडा मार्गे, विनायक सेठ चौक, मुर्बी गाव चौकमार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवला आहे. ओवेगावातील रहिवाशांना ओवेगाव चौक ते पापडीचा पाडा मार्गे तळोजा किंवा खारघर येथून इच्छित स्थळी जाता येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा

नवी मुंबई : खारघरमधील कार्यक्रमासाठी वृद्ध श्री सदस्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना सुलभरीत्या येण्यासाठी रिक्षाची सुविधा, अतिवृद्ध नागरिकांसाठी व्हीलचेअर, आरोग्याच्या प्रश्न उद्धभवल्यास स्ट्रेचर आदी सुविधांचा समावेश असणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्याच्या नियोजनासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. १४) झाली. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. हा कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी आणि उपस्थित नागरिकांना सोहळ्याचा आनंद घेता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनाप्रमाणे कामे करण्याचे निर्देश दोन्ही मंत्र्यांनी दिले.

शाळांना आज सुट्टी

खारघर : रविवारी (ता. १६) होणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार कार्यक्रमासाठी श्री सदस्यांचा मोठा जनसमुदाय येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी पनवेल महापालिका प्रशासनाने सर्व शाळा शनिवारी (ता. १५) बंद ठेवण्यात याव्यात, असे आदेश काढले आहेत. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून महाराष्ट्रभूषण पुरस्कार रविवारी प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी मोठा जनसमुदाय येण्याची शक्यता असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शाळेत येताना आणि जाताना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेल महापालिका प्रशासनाने सुट्टी जाहीर करत सर्व शाळा बंद ठेवण्यात याव्यात, अशा आदेशाचे पत्र उपायुक्त विठ्ठल डहाके यांनी काढले आहे.

महामार्गावरील वाहनांच्या मार्गात बदल

मुंबई-पुणे मार्गावरील कोपरा अंडरपासवरून स्वर्णगंगा चौकाकडे जाणारा रस्ता १५ एप्रिल रोजी दुपारी २ ते १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला. त्याऐवजी पुणे-मुंबई मार्गावरील स्वर्णगंगाकडे जाणारी वाहने कोपरा ब्रिज चढून हिरानंदानी ब्रिजखालील सिग्नलवरून यू टर्न घेऊन परत कोपरा ब्रिजजवळील डावीकडील कटने स्वर्णगंगा चौकावरून इच्छित स्थळी जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com