नवी मुंबईत अवघ्या तीस रूपयांना विकले जाते मतदान ?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 March 2020

नेरूळमध्ये उमेदवारांकडून मतदारांना लायटर, चहाच्या टोपांचे वाटप 

नवी मुंबई : महापालिका निवडणुका आता तोंडावर आल्यामुळे उमेदवारांकडून मतदार राजाला भुरळ घालण्यास सुरुवात झाली आहे. नेरूळमध्ये एका शिवसेना नगरसेवकाने त्याच्या पत्नीच्या नावाने दूध तापवण्याचा टोप आणि गॅस शेगडीचे लायटर वाटून मतदारांना प्रलोभन दाखण्यास सुरुवात केली आहे. हळदी-कुंकवाचे वाण या गोंडस नावाखाली मतदारांच्या बहुमूल्य मतदानाचे मोल अवघे 30 रुपये लावले आहे. नवी मुंबईकर या प्रलोभनाला भुलून पुढील पाच वर्षे विकासाची अपेक्षा कुणाकडे ठेवणार, असा प्रश्‍न सुजान नागरिकांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. 

एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच आजी-माजी नगरसेवकांसोबत इच्छुक उमेदवारही कामाला लागले आहेत. निवडणुकीआधी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण व रचनेमुळे बहुतांश जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे आता नगरसेवकांच्या जागेवर त्यांच्या पत्नीला संधी देण्यासाठी नगरसेवकांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत घराबाहेर न पडलेल्या या नगरसेवकांच्या पत्नीला कथित समाजसेविका ही बिरुदावली लावण्यासाठी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांनी जोर पकडला आहे. 

मोठी बातमी - १२ वर्षांपूर्वी केलेली कोरोबाबाबतची 'ही' भविष्यवाणी खरी ठरणार ?

शहरातील प्रत्येक प्रभागातील संध्याकाळ हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांनी बहरून जात आहे. आचारसंहिता घोषित झाल्यावर उमेदवारांच्या खर्चावर व वाटप होणाऱ्या वस्तूंवर निवडणूक आयोगाची करडी नजर असते. त्यामुळे आचारसंहिता घोषित होण्याआधीच काही नगरसेवकांकडून मतदारांवर भेटवस्तूंचा वर्षाव केला जात आहे. नेरूळ, जुईनगरमधील शिवसेनेच्या एका नगरसेवकाने याच हळकी-कुंकवाच्या कार्यक्रमाचा वापर आपल्या प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला आहे. हळदी-कुंकवात दिल्या जात असलेल्या वाणाच्या निमित्ताने घरोघरी जाऊन पत्नीच्या नावाने गॅस शेगडीचे लायटर आणि दूध तापवण्याचे भांडे वाटप केले जात आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून नेरूळ व जुईनगरमधील एलआयजी आणि तीन मजली इमारतींच्या सोसायट्यांमध्ये लायटर आणि दूध तापवायच्या भांड्यांनी भरलेले वाहन फिरत असते. या वाहनासोबत त्या नगरसेवकाची पत्नीही फिरत असून घरोघरी जाऊन ही भांडी मतदारांना वाटली जात आहेत. घरोघरी जाऊन महिलांना दारातच हळदी-कुंकवाची बोटे कपाळावर लावून भेटवस्तू वाटप केले जात आहेत. नगरसेवकाकडून अवघ्या तीस रुपयांच्या वस्तू देऊन मतदारांचे बहुमूल्य मत खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे नेरूळ-जुईनगर परिसरात या नगरसेवकांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. 

मोठी बातमी - मेघनाच्या मृत्यूचं गूढ उकललं, जिम ट्रेनरनेच दिलेलं...

पैठण्यांचा पाऊस 

मविआतर्फे शहरात ठिकठिकाणी भाऊजींची भेट पैठण्यावाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. अनेक ठिकाणी खेळ मांडियेला कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांमध्ये महिलांना बोलावून त्यांच्या आवडीचे कार्यक्रम राबवून पैठणी, नथ, गळ्यातील मोत्यांच्या माळा अशा भेटवस्तूंचे वाटप केले जात आहे. खेळ मांडियेला हा कार्यक्रम पाहून इतर नगरसेवकांकडूनही हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून मतदारांवर भेटवस्तूंचा पाऊस पाडला जात आहे. 

लावण्यांच्या फडाला कीर्तनातून उत्तर 

मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून कोपरखैरणे भागात गाजलेल्या लावण्यांच्या फडाचे आयोजन करण्यात येणार आहे. कोपरखैरणे भागात राहत असणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिकांना खेचण्यासाठी खास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे; तर शिवसेनेकडून ऐरोलीमध्ये ह.भ.प. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करून शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

navi mumbai municipal corporation elections are approaching see what is being done by political parties 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai municipal corporation elections are approaching see what is being done by political parties