नवी मुंबईकरांनो कशाला बाहेर पडताय, 'हा घ्या' वेबसाईटचा पत्ता आणि घरीच मागावा सर्व

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

भाजी मंडईमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी भाजीपाला, फळे नागरिकांना घराजवळ मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने किरकोळ हातगाडी विक्रेता / टेम्पोधारक यांचेमार्फत चौका-चौकामध्ये तसेच गृहनिर्माण संस्थांच्या परीसरात भाजीपाला व फळे रास्त भावात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत

नवी मुंबई : कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीत नागरीकांकडून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी होत असलेली गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने शक्कल लढवली आहे. आता महापालिका स्वतःच नागरीकांना भाजीपाला व फळे त्यांच्या घरपोच करणार आहे. नागरीकांनी त्याकरीता महापालिकेच्या संकेतस्थळावर जावून आपल्याला हवी असणाऱ्या भाजीपाला व फळांची मागणी नोंदवायची आहे. 

मोठी बातमी - राज्याचे मुख्य सचिव म्हणून अजोय महेता यांची गरज! पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. याकाळात जीवनावश्यक सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन संपूर्णपणे खबरदारी घेत आहे. कोरोना हा संसर्गातून पसरणारा आजार असल्याने भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी चौकाचौकामध्ये हातगाडी, छोटे टेम्पो अथवा गाडीच्या माध्यमातून भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी भाजी मंडईमध्ये गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तरी देखील नागरिक बाजारामध्ये तसेच भाजी मंडईत गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत आहे.

मोठी बातमी -  लॉकडाऊनमध्ये आता बिनधास्त मागवा हॉटेलातील चमचमीत पदार्थ; अजित पवारांनीच दिलीये माहिती

भाजी मंडईमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी भाजीपाला, फळे नागरिकांना घराजवळ मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने किरकोळ हातगाडी विक्रेता / टेम्पोधारक यांचेमार्फत चौका-चौकामध्ये तसेच गृहनिर्माण संस्थांच्या परीसरात भाजीपाला व फळे रास्त भावात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील आठही विभाग अधिकाऱ्यांमार्फत विभागनिहाय भाजीपाला व फळे विक्रेता टेम्पो धारकाची नावे, टेम्पो क्रमांक व मोबाईल क्रमांक नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळ www.nmmc.gov.in प्रसिध्द करण्यात येत आहे.

नागरिकांनी व संस्थेच्या पदाधिकारांनी या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपल्या परिसरात भाजीपाला व फळे विक्रीकरीता दिनांक व वेळ निश्चित करून घ्यावी. तसेच किरकोळ विक्रेत्यांनी देखील मंडईमध्ये एकाच वेळी गर्दी करू नये, याबाबत संबधितांना सूचना देण्याविषयी निर्देश दिलेले आहेत. या काळात किराणा मालाची दुकानेही नियमितपणे सुरु राहणार आहेत. बाजारपेठेत मुबलक साठा शिल्लक आहे. नागरिकांनी उगाचच घाबरून जाऊन साठा करून ठेवू नये.

सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी किरकोळ दुकानदार, व्यापारी यांनी नागरिकांना घरपोच किराणा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे तसेच नागरिकांनी थेट दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा आवश्यक सामानाची यादी तयार करून पाठवावी व दुकानदाराने दिलेल्या वेळी जाऊन सामानाची उचल करावी असे पालिकेतर्फे सूचित केले आहे.

मोठी बातमी - राजेश टोपे यांनी सांगितला कोरोना प्रतिबंधाचा फॉर्म्युला; काय आहे '3T' फॉर्म्युला?

Navi Mumbai Municipal corporation starts its online delivery service to fight against corona virus

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal corporation starts its online delivery service to fight against corona virus