नवी मुंबईतील नेत्यांची होतीये घालमेल..! वाचा नेमकी का?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

दिघ्यापासून बेलापूरच्या दिशेने नव्या पद्धतीने प्रभाग रचना तयार करताना अनेक जुने प्रभाग बदलण्याची दाट शक्‍यता आहे. पॅनेल रद्द झाले असले तरी एका सदस्यासाठी प्रभाग रचना करताना भागांना आकार देताना सीमा बदलण्याची शक्‍यता आहे.

नवी मुंबई : विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर आता नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना एप्रिल 2020 मध्ये होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहे. पॅनेल पद्धतीने होणाऱ्या पालिका निवडणुकीचा कार्यक्रम मविआ सरकारने बदलला आहे. पॅनेल पद्धती रद्द झाल्यामुळे आनंदी झालेल्या नगरसेवकांना प्रभाग रचनांचे सीमांकन व बदलणाऱ्या आरक्षणाचा फटका बसणार आहे. सीमांकन व आरक्षणामुळे प्रभाग बदलणार असल्याने अनेक प्रस्थापित नगरसेवकांच्या विजयाची समीकरणे बदलण्याची दाट शक्‍यता आहे. 

ही बातमी वाचली का? महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का...

पॅनेल पद्धतीने होणाऱ्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे पालिकेच्या निवडणूक विभागातर्फे एक सदस्यीय निवडणुकीसाठी सुरू असलेले प्रभाग रचनेचे काम आता पूर्णत्वास आले आहे. पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी प्रभागरचना प्रारूप यादी व आरक्षण सोडतीची वेळ घोषित होण्याची शक्‍यता आहे, परंतु प्रभागांना आकार देताना काही प्रभागांच्या सीमा बदलण्याची दाट शक्‍यता आहे. तसेच आरक्षणातही बदल होणार असल्यामुळे पूर्वीचे राखीव असलेले प्रभाग आता बदलणार असल्याने प्रस्थापित नगरसेवकांना नव्या प्रभागांसाठी धावधाव करावी लागू शकते. पॅनेल पद्धतींनुसार निवडणुका रद्द झाल्यानंतर सरकारने 3 जानेवारीला काढलेल्या नव्या अध्यादेशानुसार एक सदस्यीय पद्धतीसाठी प्रभाग रचना तयार करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या आरक्षणातून शिल्लक राहिलेल्या प्रभागांमधून राहिलेल्या प्रभागांमध्ये आता आरक्षण पडणार आहे. नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित करायच्या एकूण संख्येतून नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांकरिता आरक्षित करायच्या संख्या वजा केल्यानंतर येणाऱ्या संख्येइतके प्रभाग निश्‍चित करण्यात येणार आहेत. 

ही बातमी वाचली का? अमित ठाकरेंबद्दल आजी कुंदा ठाकरे म्हणतात..
 
नेते मंडळींची घालमेल 
दिघ्यापासून बेलापूरच्या दिशेने नव्या पद्धतीने प्रभाग रचना तयार करताना अनेक जुने प्रभाग बदलण्याची दाट शक्‍यता आहे. पॅनेल रद्द झाले असले तरी एका सदस्यासाठी प्रभाग रचना करताना भागांना आकार देताना सीमा बदलण्याची शक्‍यता आहे. महापालिकेने प्रभाग रचना तयार करताना सीमा न बदलतील याची खबरदारी घेतली आहे; मात्र अंतिम निर्णय निवडणूक आयोगाचा असल्यामुळे सीमा बदलण्याची दाट शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. ज्या भागात प्रस्थापित पक्षाच्या नगरसेवकांचे प्राबल्य जास्त आहे, अशा पक्षातील नेते मंडळींकडून प्रभाग रचना बदलताना पुन्हा नवे प्रभाग पदरात पडण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे सध्या विकास कामांचा धडाका लावणाऱ्या नगरसेवकांचे प्रभागातील रहिवासी भाग दुसऱ्या प्रभागात जाण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai municipal election equation will change!