नवी मुंबई : विदेशी नागरिकांची नोंदणी बंधनकारक | Navi mumbai police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Foreigners

नवी मुंबई : विदेशी नागरिकांची नोंदणी बंधनकारक

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस (navi mumbai police) आयुक्तालयाच्या हद्दीत कामानिमित्त येणाऱ्या आफ्रिकन देशातील, विशेषतः नायजेरियन, केनियन, युगांडा, तसेच बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट (foreigners passport) व व्हिसा बनावट (fake visa) असल्याचे, तसेच त्यांच्या पासपोर्ट व व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते भाड्याने घर घेऊन वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यातील अनेक परदेशी नागरिकांचा गुन्हेगारी कारवायांशी (criminal record) संबंध असल्‍याचे आढळून आले आहे.

हेही वाचा: मुंबई : टाटा रुग्णालयाला घरे मिळण्याचा मार्ग मोकळा

त्यामुळे परदेशी नागरिकांना घर भाड्याने देणाऱ्या घरमालक व गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्‍यांची माहिती ऑनलाईन सी-फॉर्ममध्ये भरणे, तसेच ती पोलिस आयुक्तालयातील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयास लेखी कळविणे बंधनकारक केले आहे. गेल्‍या काही वर्षांत बहुसंख्य बांगलादेशी आणि नायजेरियन, केनियन, युगांडा या देशातील नागरिक पासपोर्ट व व्हिसाची मुदत संपली तरी देशात वास्‍तव्य करीत असल्‍याचे आढळले आहे. अनेक जण सी-फॉर्म न भरता, परदेशी नागरिकांसाठी आवश्‍यक नोंदणी न करता नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत फ्लॅट अथवा गृहनिर्माण सोसायटीमध्ये भाड्याने घर घेऊन राहत आहेत.

बहुतांश बांगलादेशी नागरिकांकडे भारतात राहण्याची कायदेशीर परवानगी असलेला वैध पासपोर्ट व व्हिसा नसतानाही त्यांना घरकाम अथवा गृहनिर्माण सोसायटीमध्ये हाऊस कीपिंग, सिक्युरिटी गार्ड व इतर कामासाठी ठेवण्यात येते. ही अत्यंत गंभीर बाब असून कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे घरमालक व गृहनिर्माण सोसायटी व्यवस्थापकाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा परदेशी नागरिकांना भाड्याने फ्लॅट अथवा घर देताना, तसेच त्यांना कामावर ठेवताना विदेशी नागरिकांची नोंदणी कुठे व कशी करावी? याबाबत नवी मुंबई पोलिसांकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार घरमालकांनी कार्यवाही न केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा नवी मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा: वसईत अडीच हजार लिटर भेसळयुक्त ताडीचा साठा जप्त; दोन आरोपींना अटक

घरमालक, इस्टेट एजंटसाठी नियम व सूचना

- विदेशी नागरिकाचा पासपोर्ट व व्हिसा खरा आहे की बनावट आहे? मुदतीत आहे किंवा नाही? याची खात्री करण्यासाठी घरमालक किंवा गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अथवा इस्टेट एजंट यांनी त्यांचे पासपोर्ट, व्हिसा व इतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेतील विदेशी नागरिक नोंदणी अधिकारी यांच्याशी तत्काळ संपर्क साधावा. विदेशी नागरिकाचे पासपोर्ट किंवा व्हिसा हे वैध असेल तरच त्यांना वास्तव्यास ठेवावे.

- विदेशी नागरिकांनी स्वतः किंवा त्यांना राहण्यास ठेवणाऱ्या व्यक्तींमार्फत ऑनलाईन सी-फॉर्म भरून नोंदणी करणे बंधनकारक आहे.

- विदेशी नागरिक हे ज्या ठिकाणी वास्तव्यास येतात, त्या वेळी त्यांच्या आगमनापासून २४ तासांच्या आत त्यांची अचूक माहिती सी फॉर्मद्वारे ऑनलाईन भरणे व सीबीडी-बेलापूर येथील नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात लेखी कळविणे बंधनकारक आहे.

- घर रिकामे करून जाणाऱ्या विदेशी नागरिकाच्या निर्गमनाची वेळ, दिनांक तसेच तो पुढे कुठे जाणार आहे? याबाबतची सुद्धा नोंद ऑनलाईन सी-फॉर्म प्रणालीमध्ये करणे तसेच पोलिस आयुक्तालयातील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयास लेखी कळविणे बंधनकारक आहे.

- विदेशी नागरिक वास्तव्यास असलेल्या ठिकाणी तपासणीसाठी जाणाऱ्या विदेशी नागरिक नोंदणी अधिकारी अथवा दंडाधिकारी किंवा पोलिस हवालदार अथवा पोलिस अधिकारी यांनी विदेशी नागरिकांकडे माहिती विचारल्यास अथवा अधिकृत सी-फॉर्मची मागणी केल्यास वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांनी सी-फॉर्मची प्रत, व्हिसा व पासपोर्ट तसेच इतर वैध कागदपत्रे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

... अन्यथा कायदेशीर कारवाई

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील घरमालक, गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी, इस्टेट एजंट यांनी विदेशी नागरिकांना वास्तव्यास ठेवताना विदेशी व्यक्ती नोंदणी अधिनियमातील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या घरमालक व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

नोंदणी बंधनकारक

विविध कारणास्तव नवी मुंबईत येणाऱ्या विदेशी नागरिकांच्या पासपोर्ट व व्हिसाची वैधता तपासणे, आगमन व निर्गमन नोंदी ठेवणे, व्हिसा मुदतीच्या कालावधीत ते भारतातून परत जातात की नाही? तसेच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, त्यांचा भारतात येण्याचा हेतू काय आहे? याबाबतची माहिती देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अद्ययावत ठेवणे गरजेचे असल्याने नवी मुंबई पोलिसांनी विदेशी नागरिकांना ऑनलाईन सी-फॉर्म भरणे, तसेच सीबीडी बेलापूर येथील नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात विशेष शाखेतील विदेशी नागरिक कक्षात नोंदणी करणे बंधनकारक केले आहे.

loading image
go to top