संचारबंदीसाठी नवी मुंबई पोलिस सज्ज! प्रत्येक ठाण्यात 100 अतिरिक्त कर्मचारी

संचारबंदीसाठी नवी मुंबई पोलिस सज्ज! प्रत्येक ठाण्यात 100 अतिरिक्त कर्मचारी

नवी मुंबई (वार्ताहर) : नाताळ आणि नववर्षानिमित्त राज्य सरकारने पुन्हा एकदा रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. नवी मुंबईत या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. यासाठी रात्रीच्या सुमारास प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत गस्त घालणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त 100 कर्मचारी अतिरिक्त तैनात करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई परिमंडळ- 1 चे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. 

संचारबंदीसंदर्भात सर्व विभागांतील नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे रात्रीच्या सुमारास विनाकारण न फिरण्याबाबत पोलिसांनी आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग अद्याप संपला नसल्याची जाणीव करून देण्यासाठी शासनाने ही संचारबंदी लागू केल्याचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. दरम्यान, नवी मुंबईत वास्तव्यास असणारे जे नागरिक रात्री उशिराने बाहेरगावाहून नवी मुंबईत येतील, त्यांची चौकशी करून त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. 
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत रात्री 11 नंतर अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरातील अन्य दुकाने व कार्यालये बंद केली जाणार आहेत. याशिवाय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास तसेच डान्स बार, पब, रेस्तरां आदी आस्थापनादेखील बंद राहणार असल्याची माहिती नवी मुंबईचे सह पोलिस आयुक्त जय जाधव यांनी दिली. विशेष म्हणजे नाताळ आणि नववर्ष स्वागतानिमित्त गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये किंवा सोसायटीच्या टेरेसवरदेखील रात्री 11 नंतर मनोरंजनाचे कार्यक्रम अथवा अन्य कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती जय जाधव यांनी दिली. धार्मिक कार्यक्रम आयोजित करावयाचे झाल्यास संबंधितांना पोलिसांची परवानगी घेणे आवश्‍यक राहणार असल्याचे ते म्हणाले. 

हॉटेल, बारचालकांचे धाबे दणाणले 
राज्य शासनाने मंगळवारी रात्री 11 पासून लागू केलेल्या संचारबंदीमुळे मुंबई, नवी मुंबई शहरातील हॉटेल व बारचालकांचे धाबे दणाणले आहे. आधीच लॉकडाऊनमुळे हॉटेल व बारचालकांचा व्यवसाय बुडीत निघालेला आहे. महिनाभरापासून आता कुठे त्यांच्या व्यवसायाला चालना मिळत असताना राज्य शासनाने अचानक संचारबंदीचा निर्णय घेतल्याने ऐन मोसमात त्यांच्या व्यवसायावर विरजण पडले आहे. संचारबंदीच्या आदेशाबाबत पुनर्विचार करण्याकरिता हॉटेल व बार चालक संघटना राज्य शासनाकडे दाद मागणार असल्याची चर्चा हॉटेल व्यावसायिकांमध्ये आहे. 
Navi Mumbai Police ready for curfew 100 additional staff in each station

--------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com