esakal | पाण्यासाठी आदिवासींची वणवण; पावणेतील आदिवासी पाड्यांना टंचाईचे ग्रहण | water scarcity
sakal

बोलून बातमी शोधा

water scarcity

पाण्यासाठी आदिवासींची वणवण; पावणेतील आदिवासी पाड्यांना टंचाईचे ग्रहण

sakal_logo
By
शुभांगी पाटील

तुर्भे : औद्योगिक क्षेत्रामुळे (Industries) पावणे परिसराचा आर्थिक विकास झाला असला तरी येथील आदिवासी पाडे आजही मूलभूत सुविधांपासून (Basic needs) वंचित आहेत. अपुरा पाणी पुरवठा, नळ आहेत तर पाणी नाही. गावात बोअरिंग किंवा विहिरींची व्यवस्था नसल्‍याने पावणेतील वारली पाडा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण (Water scarcity) भटकावे लागते. एक किलोमीटरची पायपीट (people walking) करत डोक्यावर हंड्याचे इमले रचत पाणी भरण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे.

हेही वाचा: एनसीबीच्या परवानगीने लॉकअपमध्ये बाप-लेकाची झाली भेट

पाण्याची व्यवस्था नसतानाही साडेचार वर्षांपूर्वी महापालिकेने पावणे एमआयडीसीमधील आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर घाईघाईने वाल्मिकी आवास योजनेंतर्गत बांधलेल्या घरकुलात केले. याठिकाणी पाण्याची टाकी आहे, घराघरात नळजोडणीही देण्यात आली आहे, पण पाणीच नसल्याने जलवाहिनी गंजू लागली आहेत. ज्या वेळी स्थलांतर करण्यात आले त्यावेळी काही दिवस टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तो पण घरगुती वापरासाठी. पिण्याचे पाणी जुन्या वारली पाड्यातून आणावे लागते. हा क्रम काही दिवसांचा नसून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.

स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असतानाही नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील आदिवासी पाड्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अख्ख्या दिवस पाण्याच्या मागे जात असल्‍याने परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे. पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकावी यासाठी वारली पाडा घर बचाव संघर्ष कृती समितीकडून वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यांच्या पदरी केवळ आश्वासने पडली आहेत. आश्वासनांवर तारणारी महापालिका प्रत्यक्षात कृती शून्य असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष कृष्णा वड यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबई: वर्तमानपत्राचे महत्त्व सांगणाऱ्या वह्यांची विद्यार्थ्यांना भेट

महापालिकेच्या विविध प्रकल्पासाठी लाखो लिटर पाणी खर्ची केले जाते, पण पाड्यावर साधी नवी नळजोडणी देण्यास आडमुठेपणा केला जातो. गेली साडे चार वर्षे पाण्यासाठी पायपीट करत असल्याचा रोष पावणे वारली पाड्यातील आदिवासी व्यक्त करू लागले आहेत. सध्या नवीन पाड्यामधील रहिवासी जुन्या पाड्यावरील नळाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. दिवसरात्र या नळावर पाण्यासाठी झुंबड असते. पाण्यावरून अनेकदा वादाचे प्रसंगही निर्माण झाले आहेत.

महापालिकेने नवीन पाड्यावरील रहिवाशांसाठी पाण्यासाठी टाकी बांधली होती मात्र सध्या तिची दुरवस्‍था झाली आहे. ती टाकी कोणत्याही क्षणी कोसळू शकते, अशी भीती रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. एखाद्या दुर्गम भागात पाण्यासाठी जशी हांडे घेऊन पायपीट करावी लागते, तसेच चित्र सध्या जलसमृद्धी असणाऱ्या स्‍मार्ट सिटीत पहायला मिळते. पावसाळ्यात परिस्थिती फारशी वेगळी नसते. आता ऑक्टोबर हिटमध्ये भरउन्हात पाणी भरताना खूपच त्रास होत असल्‍याचे आदिवसीचे म्हणणे आहे.

"नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आमची फसवणूक केली आहे. घर देताना पाण्याची व्यवस्था केली जाईल असे सांगितले होते मात्र अवघे काही दिवस पाणी मिळाले त्यानंतर येरे माझ्या मागल्या सुरू झाले. प्रशासनाने पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा."
- कृष्ण वड, अध्यक्ष, वारली पाडा घर बचाव समिती

"पाड्यातील महिलांचा दिवस पाणी भरण्यातच खर्ची होत आहे. मुलांनाही आता पाणी भरावे लागते. जुन्या पाड्यावर पाण्यासाठी होणारी गर्दी व वादाचे प्रसंग नको झाले आहेत."
- संतोष गवते, रहिवासी

"एमआयडीसीत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्‍या होत्‍या. त्‍यामुळे पाण्याची समस्‍या निर्माण झाली होती. याबाबत त्वरित पाहणी करून पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल."
- शंकर जाधव, उप अभियंता, नवी मुंबई महापालिका, तुर्भे

loading image
go to top