प्लॅस्टिक मुक्त अभियानास जल्लोषात सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

नवी मुंबई महापालिकेने शहरात सुरु केलेल्या प्लॅस्टिक मुक्त अभियानाचे कौतुक करावे तेवढे कमी असून या अभियानापासून राज्यातील इतर शहरे देखील नक्कीच प्रेरित होतील

नवी मुंबई - शहरातून प्लॅस्टिक मुक्तीच्या नव्या विचारांमुळे लवकरच नवी मुंबई शहराचे सोने होणार आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध सिनेअभिनेत्री जुही चावलाने महापालिका व सकाळ माध्यम समुहाने सुरु केलेल्या प्लॅस्टिक मुक्त अभियानात केले.

"प्लॅस्टिक मुक्त नवी मुंबई' या ऐतिहासिक अभियानाला रविवारी नेरुळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथील अॅम्पीथिएटरमधून प्रारंभ झाला. त्यावेळी जुही चावला आवर्जून सहभागी झाली होती. "महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचा लौकिक आपण मुंबईतच ऐकल्याने त्यांना भेटण्याची उत्सुकता लागली होती. मुंढेंच्या धडाकेबाज कामगिरीने फार प्रभावित झाल्याने त्यांच्या प्रति मनात नेहमी आदर राहील,' असे कौतुकही जुहीने कार्यक्रमादरम्यान केले. "नवी मुंबई महापालिकेने शहरात सुरु केलेल्या प्लॅस्टिक मुक्त अभियानाचे कौतुक करावे तेवढे कमी असून या अभियानापासून राज्यातील इतर शहरे देखील नक्कीच प्रेरित होतील,' असा विश्वास जुहीने व्यक्त केला. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा व मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याने प्लॅस्टिक वापरु नका, असे आवाहन यावेळी जुहीने केले. यावेळी मराठी मालिकेतील हास्य कलाकारही सहभागी झाले होते.

महापालिका व सकाळ माध्यम समुह यांच्या वतीने शहरात प्लॅस्टिक मुक्त अभियानाला रविवारी सकाळपासून सुरुवात झाली. यावेळी उपस्थित असलेले प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी नागरिकांना प्लॅस्टिक वापरामुळे उद्भवणारे संभाव्य धोके सांगितले. तसेच सध्या महापालिकेसमोर प्लॅस्टिक मुक्ती व स्वच्छतेचे एकच लक्ष्य असल्याचे त्यांच्या सुमधूर आवाजात गाणे गाऊन सांगितले. यावेळी सर्व उपस्थित कलाकारांचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वागत करुन महापालिकेने प्लॅस्टिक विरोधी सुरु केलेल्या मोहिमांची माहिती दिली. महापालिकेने शहरातील उद्यानांसहीत मैदाने व सार्वजनिक जागांवर प्लॅस्टिक वापरावर बंदी लावण्यासोबतच पर्याय म्हणून कापडी व कागदी पिशव्या वापरायचे आवाहन मुंढेंनी केले. तर महापालिका केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणात सहभागी झाली असून सर्वांनी महापालिकेने विचारलेल्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे देऊन महापालिकेला केंद्रात पहिले स्थान मिळवून देण्यास आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी मुंढेंनी केले.

आपण दैंनदिन जीवनात अनेकदा प्लॅस्टिकच्या वस्तू वापरुन टाकत असतो. त्यामुळे पर्यावरणाचे सतुलन बिघडते म्हणून सकाळने महापालिके समोर प्लॅस्टिक मुक्तीची संकल्पना मांडली असे मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक राहुल गडपाले यांनी सांगितले. या कार्यक्रमात कलर्स मराठी वाहिनीवरील कॉमेडीची बुलेटट्रेन या मालिकेतील हास्य कलाकार अभिनेते अरुण कदम, समिर चौगुले, प्रभाकर मोरे यांच्यासह सख्या रे या मालिकेतील मुख्य कलाकार सुयश टिळक व ज्येष्ठ अभिनेते अरूण नलावडे सहभागी झाले होते. 

मुंबईतून सुरूवात व्हायला हवी होती?

नवी मुंबई व सकाळ माध्यम समुहाने नवी मुंबईत सुरु केलेले प्लॅस्टिक मुक्त नवी मुंबई हे अभियान खरं तर मुंबईत सुरु व्हायला पाहिजे होते, असे मत जुहीने व्यक्त केले. परंतु हा स्तुत्य उपक्रम महापालिकेने घोषीत करून त्याची केलेली अंमलबजावणी कौतुकास्पद असून या उपक्रमातून मुंबई शहराला काही तरी शिकायला मिळेल, असा विश्वास जुहीने व्यक्त केला. तसेच या अभियानाचे यशस्वी मॉडेल नंतर राज्यभर लागु करण्यात येईल अशी अपेक्षा जुहीने व्यक्त केली.

Web Title: Navi mumbai witness plastic free initiative