#NavDurga मृदुभाव जागवा! 

#NavDurga मृदुभाव जागवा! 

ऋजुता, सहनशीलता, सहृदयता ही बाई असण्याशी जोडली गेलेली श्रेष्ठ मानवी मूल्ये आहेत. बाई व पुरुष प्रत्येकाच्या वागण्यात ती असावीत. समाजकारणात, राजकारणात वावरतानादेखील ती दिसावीत. ही मूल्ये रुजवणे व त्यांचा आदर करणे निकोप समाजासाठी आवश्‍यक आहे. 

आपण नवरात्रात स्त्रियांना देवी म्हणून पुजतो; मात्र प्रत्यक्ष आयुष्यात माणुसकीची वागणूकदेखील तिच्या वाट्याला येत नाही. दुर्गेला पुजतो म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या पराक्रमी स्त्रीलाच पुजतो; पण तरीही आपल्यापोटी मुली जन्मालाच येऊ नयेत, असे वाटणाऱ्या लोकांचे आपल्या समाजातील प्रमाण भयावह आहे.

जादूटोणाविरोधी कायद्याखाली महाराष्ट्रात जे गुन्हे नोंदले गेले, त्यांचा तपशील बघितला तर लक्षात येते की जादूटोण्याच्या नावे महिलांचे आर्थिक व शारीरिक शोषण करणे ही महाराष्ट्रात अगदी सर्वत्र घडणारी बाब आहे. 

स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा आहे, हे दाखवणारा चष्मा तुम्हाला एकदा प्राप्त झाला तर तुम्हाला स्त्री-पुरुष असमानतेचे वेगवेगळे पैलू दिसतील. एकदा सहलीला गेले असताना एका स्त्रीवादी आईची लहान लेक आमच्यासोबत होती. तेथील एका बागेत मुलींना बसवून ठेवले होते आणि मुलांना मात्र खेळायला सोडले होते. हे पाहून तिने चटकन विचारले की, ‘तिथे मुलींना खेळण्याची परवानगी नाही वाटते!’ स्त्री-पुरुषांना मिळणाऱ्या वागणुकीत कसा फरक केला जातो हे जाणणारी नजर लहानपणापासून तयार केली पाहिजे. एकदा का तुम्हाला समाजाचे निरीक्षण करायची दृष्टी प्राप्त झाली की, तुम्ही त्याप्रमाणे विचार करू लागता.

१५० वर्षांपूर्वी आपण महिला जिथे होतो, त्या व आपल्या आजच्या स्थानात निश्‍चित फरक पडलाय. आपल्याला या ठिकाणी पोहोचवण्यासाठी अनेकांनी आपले आयुष्यपणाला लावले आहे. याची जाण ठेवून या साखळीचा एक दुवा होण्याचा प्रयत्न आपण करत राहायला हवा. 

मुक्ता दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्या

(शब्दांकन : अदिती पराडकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com