मुंबईकरांनी जपला नात्यातला गोडवा!

दादर - दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी केलेल्या स्कूटरची सुरू असलेली पूजा.
दादर - दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी केलेल्या स्कूटरची सुरू असलेली पूजा.

मुंबई - दसऱ्याचा मुहूर्त साधत आज मुंबईकरांनी शुभशकुन म्हणून मंदीतही सोने, वाहन आणि नवीन वस्तूंची खरेदी केली. महागाई भडकल्याने बाजारात फारशी गर्दी नसली तरी उत्साह कायम होता. आप्तेष्टांच्या भेटीगाठी घेऊन आनंद साजरा केला. घराघरांमध्ये कुटुंबांतील सदस्यांनी एकमेकांना आपट्याची पाने वाटून नात्यातला गोडवा कायम ठेवला. लहान मुले आणि मोठ्यांनी सकाळी सरस्वती देवीची यशासांग पूजा केली.

सण म्हटले की गोडधोड आलेच. म्हणूनच सकाळी मिठाईच्या दुकानांमध्ये श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम, जिलेबी आणि बासुंदी घेण्यासाठी गर्दी झाली होती. दादरमध्ये काही ठिकाणी साई सप्ताह सुरू होता. त्या ठिकाणी झालेल्या भंडाऱ्यालाही गर्दी झाली होती. तिथे भाविकांनी साईबाबांच्या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. बाजारात मंदी असली तरी काही उत्साही मंडळींनी मुहूर्ताला सोन्याची आणि नवीन वस्तूंची खरेदी केली. 
सावरकर स्मारकात खासदार राहुल शेवाळे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. स्मारकामधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. टीव्ही, मोबाईल, वॉशिंग मशीन आणि इतर गॅझेटच्या खरेदीकडे  ग्राहकांचा कल होता. आझाद मैदानात दरवर्षीप्रमाणे रामलीला आयोजित करण्यात आली होती. तिथे रावणाचे दहन करण्यात आले.

‘बालमोहन’चा विद्यार्थी मेळावा 
बालमोहन विद्यामंदिरमध्ये दसरा सण वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो. सकाळी आठ वाजता शाळेमध्ये आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्यांची भेट घेतात. एकमेकांना आपट्याची पाने वाटून शिक्षकांचे आशीर्वाद घेतात. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. दुरावलेल्या आपल्या सच्च्या मित्रांना भेटण्याची संधी त्यानिमित्त मिळते. सकाळी पारंपरिक वेषात शिवाजी पार्कमध्ये बालमोहन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे दसरा सेलिब्रेशन सुरू असते.

वाहनविक्रीची गती मंद
दसऱ्याच्या मुहूर्तावर आज जोरदार वाहनविक्री होईल, असा विक्रेत्यांचा अंदाज होता. मात्र, मुंबई परिसरात अपेक्षेपेक्षा वाहनांची कमीच विक्री झाली. त्यामुळे आता दिवाळीतच विक्री वेग घेईल, अशी आशा विक्रेत्यांना लागली आहे. इंधनाचे चढे भाव रोजच वाहनचालकांना धडकी भरवत असल्याने नव्या गाड्यांची खरेदी टाळली, असा होरा विक्रेत्यांनी वर्तविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com